पिंपरी : आयटीनगरी हिंजवडीत मोटार खरेदीवर भरघोस सवलत देण्याचे आमिष दाखवून रावेत येथील एक व्यक्ती आणि त्याच्या मित्रांची दीड कोटी रुपयांची फसवणूक केली. ही घटना २८ ऑक्टोबर २०२४ ते ७ मे २०२६ दरम्यान हिंजवडी परिसरात घडली. दरम्यान, उर्से येथे अलिशान मोटारीतून गांजाची वाहतूक करणाऱ्या दिल्लीतील तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी ३५ वर्षीय व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला सवलतीमध्ये मोटार देतो असे सांगून मोटार बुक करायला लावली. त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. तसेच फिर्यादीच्या मित्रांना २० टक्के सवलतीचे आमिष दाखवून त्यांच्याकडूनही मोठी रक्कम उकळली. आरोपीने अशा प्रकारे एकूण एक कोटी ५० लाख ८४ हजार ८१७ रुपयांचा अपहार करून विश्वासघात केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

अलिशान मोटारीतून गांजाची वाहतूक, दिल्लीतील तरुण अटकेत

अलिशान मोटारीतून अवैधरित्या गांजाची वाहतूक करणाऱ्या एका दिल्लीतील तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथकाने उर्से टोल नाक्यावर सापळा रचून पकडले. ही कारवाई बुधवारी (६ मे) रात्री पावणे अकराच्या सुमारास करण्यात आली.डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सचे अधिकारी दीपांश ठकराल (वय ३४) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ओसामा रईस अहमद (वय २७, रा. जामिया नगर, दक्षिण दिल्ली) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस गस्त घालत असताना आरोपी आपल्या अलिशान मोटारीमधून जात होता. संशयावरून मोटारीची झडती घेतली असता त्याच्याकडे ७२.११ ग्रॅम वजनाचा हायड्रोफोनिक गांजा सापडला. पोलिसांनी गांजा आणि मोटारीसह १० लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिरगाव पोलीस तपास करत आहेत.

हॉटेलसमोर का बसलात म्हणत तरुणाला मारहाण

हॉटेलसमोर बसल्याच्या कारणावरून एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना मंगळवारी (५ मे) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हिंजवडी येथे घडली. याप्रकरणी अमित विनोद सिंग (३०, लक्ष्मी चौक, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आदित्य संतोष जांभुळकर (२३, हिंजवडी गावठाण) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र हॉटेलसमोरील एका झाडाखाली गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपी तिथे आला आणि “माझ्या हॉटेलसमोर का बसता?” असे म्हणत वाद घालू लागला. रागाच्या भरात आरोपीने दांडक्याने फिर्यादीच्या पाठीवर, हातावर आणि पायावर मारून त्यांना गंभीर जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचे आमिष दाखवून २६ लाखांची फसवणूक

शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. ही घटना २० नोव्हेंबर २०२५ ते ५ मे २०२६ दरम्यान रहाटणीत ही घटना घडली. या प्रकरणात ५८ वर्षीय व्यक्तीने काळेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार एका महिलेसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला व्हॉटस्अॅप ग्रुपमध्ये ॲड करून शेअर मार्केटची माहिती दिली. जादा नफ्याचे आमिष दाखवून त्यांना विविध बँक खात्यांवर ऑनलाईन पैसे पाठवण्यास भाग पाडले. अशा प्रकारे फिर्यादीची एकूण २६ लाख ३९ हजार ७५० रुपयांची फसवणूक करण्यात आली. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.

पिस्तूल बाळगल्या प्रकरणी एकाला अटक

पिंपरी रेल्वे रुळाच्या संरक्षण भिंतीजवळ बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गुरुवारी (७ मे) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास निराधार नगर येथे घडली. सुनील अंकुश खेडकर (२३, भीमनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई रोहित वाघमारे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस गस्तीवर असताना आरोपी संशयास्पद रितीने झाडाखाली थांबलेला आढळला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल, एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस सापडले. शहरात शस्त्रबंदी आदेश लागू असतानाही त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

चिंचवड येथे तडीपार गुंडाला अटक; पिस्तूल जप्त

पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेला गुन्हेगार आदेशाचे उल्लंघन करून शस्त्र घेऊन फिरताना आढळला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (७ मे) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास चिंचवडमधील केशवनगर येथे करण्यात आली. या प्रकरणात पोलीस अंमलदार सुनील बाचकर यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विजय राजू काळे (२७, लिंकरोड, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी विजय काळे याला नोव्हेंबर २०२४ मध्ये पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच तो शहरात विनापरवाना पिस्टल आणि काडतूस घेऊन फिरताना पोलिसांना सापडला. शस्त्रबंदी आदेशाचा भंग आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.