पिंपरी : हिंजवडी आयटी पार्क परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीतील सुरक्षारक्षकाने नऊ वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे केल्याची घटना उघडकीस आली आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हा प्रकार बुधवारी (२९ एप्रिल) घडला आहे.
विजय मधुकर चव्हाण (वय २४, रा. हिंजवडी, मूळ यवतमाळ) असे अटक केलेल्या आरोपी सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी याबाबत माहिती दिली. बुधवारी दोन लहान मुली गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात खेळत होत्या. यावेळी तिथे तैनात असलेला आरोपीने दोन्ही मुलींना गोड बोलून आपल्याकडे बोलावून घेतले. मुली जवळ येताच त्याने त्यातील एका मुलीशी अश्लील वर्तन केले. मुलीने तिथून पळ काढला आणि थेट घर गाठून पालकांना घडलेला प्रकार सांगितला. पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तक्रार प्राप्त होताच मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी सोसायटीत जाऊन आरोपी विजय याला ताब्यात घेतले. त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
५५० किमी पाठलाग करून घरफोडी करणाऱ्या टोळीला बेड्या; पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची कामगिरी
चाकण येथील एका ज्वेलर्स दुकानावर गॅस कटरच्या सहाय्याने दरोडा टाकणाऱ्या परराज्यातील सराईत टोळीचा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ ने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी ५५० किलोमीटरपर्यंतच्या सीसीटीव्ही फुटेजची अतिशय बारकाईने पाहणी करत राजस्थान आणि गुजरात येथील चार आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ३० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ एप्रिल २०२६ रोजी चाकण बाजारपेठ येथील एका ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर आणि लोखंडी ग्रील गॅस कटरने तोडून अज्ञात चोरट्यांनी ७७ लाख २२ हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व रोकड लंपास केली होती. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या पथकाने तपास सुरू केला. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही तपासले असता एक संशयीत मोटार नाशिकच्या दिशेने जाताना दिसली. या मोटारीचा माग काढत पोलीस पथकाने गुजरात राज्यापर्यंत तब्बल ५५० किमीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी गुजरात आणि राजस्थानमध्ये असल्याची खात्री पटताच पोलिसांनी सापळा रचून चार जणांना अटक केली.
पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार आणि सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष कसबे, उपनिरीक्षक भरत गोसावी व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
