पुणे : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो ही आयटी पार्कला पुण्याच्या मध्यवर्ती शिवाजीनगर भागाशी जोडणारी आहे. या मार्गावरील पहिल्या १२ स्थानकांदरम्यान मेट्रो सेवा सुरू करण्यास २३ जुलैला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी मंजुरी दिली. मात्र, ही सेवा अद्याप सुरू झालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळत हे उद्घाटन लांबल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी ही मेट्रो सुरू होण्यास झालेल्या विलंबावरून सरकारला आरसा दाखविला.

हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कसह परिसरातील पायाभूत सुविधांचा प्रश्न सुटत नसल्याने आयटी कर्मचाऱ्यांसह स्थानिक रहिवासी रविवारी रस्त्यावर उतरले. त्यांचा स्मार्ट आयटी सिटी संकल्प मूक मोर्चा सध्या आयटी पार्कमध्ये काढण्यात आला. त्याला लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना ( उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे हेही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. यानिमित्ताने हिंजवडीतील पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेचा प्रश्न सरकार गांभीर्याने घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

याविषयी आदित्य ठाकरे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी मी हिंजवडी येथे स्थानिक नागरिक, गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी आणि आयटी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आज त्याच त्रस्त नागरिकांनी प्रशासनाच्या आणि सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात पुकारलेल्या मोर्चात सहभागी झालो. लाखो तरुण आणि फॉर्च्युन ५०० कंपन्यांचे केंद्र असलेल्या हिंजवडीची अवस्था आज दयनीय आहे, भयंकर वाहतूक कोंडी, जीवघेणे खड्डे, कचऱ्याचे ढीग, अपुरा पाणीपुरवठा आणि पूर्ण झालेली मेट्रोही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत! या प्रशासकीय गोंधळामुळे कंपन्या स्थलांतराच्या तयारीत असून लाखो तरुणांचा रोजगार धोक्यात आहे. मुख्यमंत्री याच भागात येऊनही हिंजवडीकरांना भेटले नाहीत; उलट आवाज उठवणाऱ्या नागरिकांना नजरकैदेत ठेवण्यात आले. हिंजवडीकरांच्या लढ्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी आहे.

या आंदोलनात स्थानिक शेतकरी, रहिवासी, रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन माण, हिंजवडी-माण-मारूंजी इन्फ्रा फोरम, फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज, हिंजवडी एम्प्लॉईज अँड रेसिडंट्स ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड को-ऑप हाऊसिंग फेडरेशन, मुळशी को-ऑप हाऊसिंग फेडरेशन या संघटना सहभागी झाल्या आहेत. या आंदोलनाची सुरूवात हिंजवडीतील इन्फोसिस सर्कलपासून झाली. हा मोर्चा शिवाजी चौकमार्गे पुन्हा इन्फोसिस सर्कल चौकात येऊन तिथे या मोर्चाची सांगता झाली. शांततामय पद्धतीने हे आंदोलन करण्यात आले. त्यात आयटी कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिकांनी फलक हातात घेऊन आपल्या मागण्या मांडल्या.

प्रमुख मागण्या

  • रस्त्यांचे भूसंपादनाचे प्रश्न तातडीने निकाली काढावेत.
  • माण-शिवाजीनगर मेट्रो तातडीने सुरू करावी.
  • मुख्यमंत्र्यांनी सर्व शासकीय यंत्रणांची संयुक्त बैठक हिंजवडीत घ्यावी.
  • हिंजवडी-माण-मारूंजी परिसरासाठी स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करावी.
  • वाकड उड्डाणपुलासह भूमकर चौक, पुनावळे, ताथवडे येथील भुयारी मार्गातील वाहतूक कोंडी सोडवावी.
  • मुळशी धरणातून दोन टीएमसी पाण्याचा साठा निश्चित करावा.
  • वाहतूक पोलिसांचे मनुष्यबळ दुप्पट करावे.
  • मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियमितपणे त्रैमासिक आढावा घ्यावा.