पुणे : पुणेकरांसह लाखो आयटी कर्मचाऱ्यांचा रोजचा प्रवास सुकर करणारी हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सेवा सुरु होण्याची प्रतीक्षा कायम आहे. या मार्गावरील सेवेला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी २३ जुलैला मंजुरी दिल्याने सेवा सुरू होण्याचा मार्ग खुला झाला. परंतु तीन आठवड्यानंतरही ही सेवा सुरू झालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो सेवेचे उद्घाटन करण्याचा अट्टाहास राज्य सरकारने धरला आहे. परंतु पंतप्रधानांची वेळ मिळत नसल्याने उद्घाटन लांबणीवर पडत असल्याचे समोर आले आहे.
हिंजवडी आयटी पार्कला पुण्याच्या मध्यवर्ती भागाशी जोडणाऱ्या पुणेरी मेट्रोची सेवा सुरु होण्याची प्रतीक्षा पुणेकरांसह लाखो आयटी कर्मचाऱ्यांना आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयांतर्गत कार्यरत मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीएमआरएस) माण स्थानक ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय (बालेवाडी) या १२ स्थानकांदरम्यानच्या टप्प्यावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यास २३ जुलैला मंजुरी दिली. त्यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) राज्य सरकारला पत्र लिहिले आहे. यात मेट्रोच्या उद्घाटनाची तारीख निश्चित करण्याची विनंती करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील आतापर्यंतच्या सर्व मेट्रो प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. प्रत्येक टप्प्यातील मेट्रो सेवा सुरू करण्यास हिरवा झेंडा मोदींनीच दाखविला आहे. त्यामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते व्हावे, अशी भूमिका मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली आहे. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवले आहे. अद्याप पंतप्रधानांची वेळ मिळत नसल्याने उद्घाटन लांबणीवर पडले आहे. संसदेचे अधिवेशन आता संपले असून लवकरच पंतप्रधानांची वेळ मिळून हे उद्घाटन होण्याची शक्यता आहे.
पहिला टप्पा सुरु होणार
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो दोन टप्प्यात सुरू होणार आहे. पहिला टप्पा मान ते बालेवाडी आणि दुसरा टप्पा बाणेर हायस्ट्रीट ते शिवाजीनगर असा असेल. माण ते बालेवाडी १२ स्थानकांदरम्यानच्या सेवेला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी २३ जुलैला तात्पुरते प्राधिकरण प्रदान केले आहे. या मंजुरीमुळे सीबीटीसी सिग्नलिंग प्रणालीअंतर्गत एटीपी मोडवर मेट्रो ताशी ८० किलोमीटर या कमाल वेगाने धावू शकणार आहे. सर्व वैधानिक तपासण्या, चाचण्या आणि सुरक्षा मानकांची पूर्तता झाल्यानंतरच ही मंजुरी देण्यात आली आहे. सुमारे १३ किलोमीटर लांबीचा हा दुहेरी मार्ग ७५० व्होल्ट डीसी थर्ड रेल ट्रॅक्शन प्रणालीवर कार्यरत राहणार आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाकडे निर्णय प्रलंबित
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील सेवा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र लिहिले आहे. राज्य सरकारकडून उद्घाटनाची तारीख निश्चित करण्यात येईल. ही तारीख निश्चित होऊन लवकरच या मार्गावरील सेवा सुरू होईल, अशी माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी दिली.
