पुणे : ‘देशात यापूर्वी ‘गरिबी हटाव’च्या केवळ घोषणाच होत होत्या. अनेक पिढ्या या घोषणांमध्ये वाढल्या. आता मात्र प्रत्यक्षात देशातील गरिबी हटत आहे. गेल्या १०-१२ वर्षांत देशातील ५० कोटी लोकांनी भीषण गरिबीवर मात केली. आपला देश आज वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहेच; पण त्याचबरोबर गरिबी कमी करणारा आघाडीचा देशही आहे,’ अशी माहिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिली. नुकत्याच जाहीर झालेल्या ‘वर्ल्ड बँके’च्या अहवालातून हेच अधोरेखित होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. राज्यपाल जिष्णू देव शर्मा, केंद्रीय मंत्री मनोहर लाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे आदी या वेळी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘कठीण वैश्विक परीस्थितीतही देशाने विकासाची गती कायम राखली. पूर्वी योजनांचे पैसे भावकीत, भाऊबंदाच्या वाट्यात, घोटाळ्यांमध्ये जात होता. आता मात्र लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होतात. गरिबांना सशक्त केले, तर त्यांना त्यातून बाहेर पडता येते, हे सिद्ध झाले आहे. नागरिकांचा वेळ वाचतोय. त्यामुळे कुटुंबांसाठी अधिक कमाई करण्याची संधी मिळत आहे.’
‘हे परिवर्तन एकदम झाले नाही. यापूर्वीच्या सरकारांनी केवळ घोषणाबाजी केली. आपले सरकार शेतकऱ्यांना, सर्वसामान्यांना पाठबळ देत आहे. आपल्या शहरांना जगातील सर्वोत्तम शहर म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. देशातील सगळ्या लहान शहरांना सशक्त करण्यात येत आहेत. देशातील ऊर्जा, महामार्ग, रेल्वेमार्ग, उड्डाणपूल उभारणीसाठी अनेक नव्या योजना आणण्यात येत आहे. विकसित भारत बनविण्यासाठी देशातील प्रत्येक युवकाने आत्मविश्वासाने योगदान द्यायला हवे,’ असेही त्यांनी सांगितले.
‘पूर्वी कोणत्याही शहराची ओळख येथील उद्योगांवरून, खाणपाणाच्या ठिकाणावरून होत होती. आता शहरात किती सुविधा मिळतात, ते राहण्यायोग्य आहे का, याचा विचार करावा लागतो. मेट्रोमुळे शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतात,’ असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
२०१४ नंतर मेट्रोचा विस्तार
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘देशात १९८४ मध्ये पहिली मेट्रो धावली. त्यानंतर ३० वर्षात २३८ किलोमीटर मेट्रो मार्ग बांधले गेले. २०१४ पर्यंत केवळ पाच शहरात मेट्रो धावत होती. हीच जुनी मानसिकता देशात असती, तर पुण्याला मेट्रो मिळायला अजून दशकांची वाट पहावी लागली असती. पण, २०१४ नंतर आपल्या देशात १ हजार २०० किलोमीटर मेट्रो मार्गांची उभारणी झाली. आज देशातील २६ शहरांमध्ये मेट्रो धावते. दररोज एक कोटी नागरिक मेट्रोने प्रवास करतात.’
‘यापूर्वी देशातील इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्राचीही स्थिती बिकट होती. २०१४ मध्ये महाराष्ट्रात ११ किलोमीटरचे मेट्रो मार्ग होते. आता १७५ किलोमीटरचे मेट्रो मार्ग आहेत. सुमारे ६८० किलोमीटरहून अधिक मेट्रो मार्गांचे काम सुरू आहे. मेट्रोच्या माध्यमातून राज्यात १.५ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक आली. हा पैसा श्रमिकांच्या खिशात जात आहे. लहान दुकानांना, उद्योगांना बळ मिळत आहे.’ असेही त्यांनी सांगितले.
