पुणे : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सेवा सुरू होण्याची पुणेकरांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कला पुण्याच्या मध्यवर्ती भागाशी जोडणाऱ्या या मार्गिकेवरील सेवा सुरू होण्यातील सर्वांत महत्वाचा टप्पा आता पूर्ण झाला आहे. ही मेट्रो सेवा सुरु झाल्यानंतर आयटी कर्मचाऱ्यांसह लाखो पुणेकरांचा प्रवास जलद आणि आरामदायी होणार आहे.

शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो ही पुण्यातील तिसरी मेट्रो मार्गिका आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड कंपनीसमवेत राबविण्यात येत आहे. या मार्गावरील सेवा सुरू करण्यातील सर्वांत महत्त्वाचा टप्पा मानली जाणारी तपासणी आता पूर्ण झाली आहे. केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या पथकाने या मेट्रो मार्गाची तपासणी केली. ही तपासणी सुमारे चार दिवस सुरू होती. त्यानंतर आता अंतिम तपासणी लवकरच होणार आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतर या मार्गावरील सेवा सुरू करता येणार आहे.

दोन टप्यांत सेवेचे नियोजन

हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावरील मेट्रो सेवा दोन टप्प्यांत सुरू करण्याची नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात १२ स्थानकांपर्यंत सेवा सुरू करण्यात येईल. त्यात माण ते रामनगर ( बाणेर) या १२ स्थानकांदरम्यान मेट्रो धावेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ११ स्थानकांची सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यात हाय स्ट्रीट (बाणेर) ते शिवाजीनगर या ११ स्थानकांदरम्यान सेवा सुरू होईल. दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर मेट्रो सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होऊन प्रवाशांचा पुणे ते हिंजवडी हा प्रवास वेगवान होणार आहे.

लवकरात लवकर सेवा

‘पीएमआरडीए’तील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मेट्रो मार्गिकेचे काम ९५ टक्क्यांहून अधिक पूर्ण झालेले आहे. हिंजवडीपासून बाणेरपर्यंतच्या मेट्रो स्थानकांची कामे वेगाने सुरू आहेत. या मार्गिकेची तपासणी करण्यासाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांना पत्र लिहिण्यात आले होते. त्यांच्या पथकाकडून मे महिन्याच्या अखेरीस या मार्गाची तपासणी झाली. त्यानंतर आता अंतिम तपासणी होईल. या तपासणीनंतर आयुक्तांकडून मेट्रो सेवा सुरू करण्यास मंजुरी मिळेल. त्यानंतर लवकरात लवकर मेट्रो सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो

एकूण लांबी – २३ किलोमीटर

एकूण स्थानके – २३

पहिल्या टप्प्यातील सेवा

१२ स्थानके

माण ते रामनगर (बाणेर)

दुसऱ्या टप्प्यातील सेवा

११ स्थानके

हाय स्ट्रीट (बाणेर) ते शिवाजीनगर