पुणे : आफ्रिकेतील कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या देशांमध्ये इबोला विषाणूचा उद्रेक झाल्याने जागतिक आरोग्य यंत्रणा दक्ष झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना खबरदारीच्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या असून, राज्य सरकारनेही मुंबई, पुणे आणि नागपूर या आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या शहरांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
पुणे शहरात सध्या इबोला विषाणूचा एकही रुग्ण आढळला नसला, तरी संभाव्य धोका लक्षात घेऊन आरोग्य यंत्रण सज्ज ठेवण्यात आली आहे. संसर्गजन्य आजारांवरील उपचारांसाठी राज्यातील प्रमुख केंद्र असलेल्या पुणे महापालिकेच्या नायडू रुग्णालयात स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला असून, संशयित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक औषधे, वैद्यकीय साहित्य आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती नायडू रुग्णालयातील सूत्रांनी दिली आहे.
पुणे विमानतळावर १८ मे पासून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. विशेषतः इबोला प्रभावित देशांमधून किंवा त्या परिसरातून प्रवास करून आलेल्या नागरिकांची प्रवासाची माहिती, आरोग्यस्थिती आणि संभाव्य लक्षणांची तपासणी करण्यात येत आहे. ताप, तीव्र अशक्तपणा, डोकेदुखी, स्नायूदुखी, उलट्या, जुलाब किंवा रक्तस्राव यासारखी लक्षणे अद्याप कोणत्याही प्रवाशांमध्ये आढळली नसली, तरी यातील एकाला दक्षता म्हणून नायडू रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्याच्यामध्ये इबोला संसर्ग आढळून आलेला नाही याचा अहवालही नकारात्मक आल्याचे राज्याचे साथरोग नियंत्रण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
संशयित रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही), पुणे येथे पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, राज्य आरोग्य विभागाने सर्व जिल्हा रुग्णालये, महापालिका रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. संशयित रुग्ण आढळल्यास तातडीने माहिती देणे, विलगीकरणाची व्यवस्था करणे आणि संपर्कात आलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवणे, अशा उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पुण्यात सध्या इबोलासदृश लक्षणे असलेला एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून पुणे, मुंबई आणि नागपूर विमानतळांवर इबोलाबाधित देशांतून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. राज्य शासनाने पूर्वतयारी पूर्ण केली असून, बाणेर येथील नायडू रुग्णालयात विशेष विलगीकरण कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. – डॉ. संदीप सांगळे, सहसंचालक, आरोग्य विभाग
