पिंपरी : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रवासासाठी ६२ रुपये मोजावे लागणार आहेत. प्रशासनाने मेट्रोचे दरपत्रक जाहीर केले असून १२ रुपयांपासून ते ६२ रुपयांपर्यंत तिकीट आकारणी होणार आहे. ऑनलाइन ऍप, क्यूआरकोड तसेच तिकीट काउंटरला जाऊन प्रवाशांना तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३ नोव्हेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने मेट्रोचे लोकार्पण होणार असल्याचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले. ४ नोव्हेंबरपासून मेट्रो नागरिकांच्या प्रवासी सेवेसाठी उपलब्ध असणार आहे.
बालेवाडी येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो मार्ग २३ किलोमीटरचा असून यावर २३ स्थानके आहेत. हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारीत (पीपीपी) तत्वावर राबविण्यात आला आहे. भूसंपादन व विविध सेवा सुविधांच्या स्थलांतरासह या प्रकल्पाचा अंदाजित खर्च आठ हजार ३१३ कोटी इतका आहे. भारत सरकारच्या राष्ट्रीय मेट्रो रेल धोरण २०१७ अंतर्गत अशा स्वरूपात राबविण्यात येणारा हा देशातील पहिला प्रकल्प आहे. पीएमआरडीएने केलेल्या करारानुसार ट्रेन अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि सिमेंस प्रोजेक्ट वेंचर्स जीएमबीएच यांच्या संयुक्त सहभागातून स्थापन करण्यात आलेल्या पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या कंपनीमार्फत या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आल्याचे आयुक्त डॉ. चौधरी यांनी सांगितले.
स्थानक – तिकीट दर (रुपये)
० ते २ – १२
२ ते ४ – २५
४ ते ८ – ३७
८ ते १२ – ४३
१२ ते १८ – ४९
१८ ते २३ – ६२
असा असेल मेट्रो प्रवास
- हिंजवडी ते शिवाजीनगर म्हणजे पहिल्या स्थानकापासून शेवटच्या स्थानकापर्यंत प्रवास करता येणार
- १७ स्थानके वापरता येणार उर्वरित ६ स्थानके जानेवारीपर्यंत सुरू होणार
- सकाळी सहा पासून रात्री ११.४० पर्यंत मेट्रो धावणार
- गर्दीच्या वेळेत दोन फेऱ्यांमधील अंतर सहा मिनिटे तर गर्दी नसलेल्या वेळेत दोन फेऱ्यांमधील अंतर १२ मिनिटे राहणार
- मेट्रो रेल गाड्यांना विद्युत पुरवठा करण्यासाठी ७५० होल्ट डीसी थर्ड रेड प्रणालीचा अवलंब
- आधुनिक वाहतूक नियंत्रण दिवे (सिग्नल) तंत्रज्ञानावर आधारित सीबीटीसी कम्युनिकेशन बेस्ट ट्रेन कंट्रोल प्रणाली
- मेट्रो प्रकल्पांतर्गत दररोज ६.६० मेगाव्हॅट सौर ऊर्जा निर्मिती होणार, एकूण ऊर्जेच्या ३० टक्के सौर ऊर्जा वापरले जाणार
महिला करणार सारथ्य
हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गावर चालणाऱ्या सर्व मेट्रोचे महिला ट्रेन पायलटद्वारे चालवण्यात येणार आहे. त्याशिवाय स्थानक नियंत्रक तिकीट कर्मचारी आणि स्थानक अटेंडन्स सह सुमारे पन्नास टक्के स्थानक कर्मचारी महिला असणार आहेत.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३ नोव्हेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने लोकार्पण होणार आहे. ४ नोव्हेंबर पासून मेट्रो नागरिकांच्या प्रवासी सेवेसाठी उपलब्ध असणार आहे. दररोज अंदाजे दोन ते अडीच लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करण्याचा अंदाज असल्याचे पीएमआरडीए आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले.
