पुणे : पुणेकरांसह आयटी कर्मचाऱ्यांचा रोजचा प्रवास सुकर करणारी पुणेरी मेट्रो सेवा सुरू या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार आहे. या मार्गावरील सेवा पहिल्या १२ स्थानकांपर्यंत सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र आता माणपासून जिल्हा न्यायालयापर्यंत संपूर्ण मेट्रो मार्गावर आणि १७ स्थानकांवर सेवा सुरू करण्यात येणार आहे. या सेवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

हिंजवडी आयटी पार्कला पुण्याच्या मध्यवर्ती भागाशी जोडणाऱ्या पुणेरी मेट्रोची सेवा सुरू होण्याची प्रतीक्षा पुणेकरांसह आयटी कर्मचाऱ्यांना आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीएमआरएस) माण स्थानक ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय (बालेवाडी) स्थानक या १२ स्थानकांदरम्यानच्या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यास २३ जुलैला मंजुरी दिली. त्यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सुरूवातीला १२ स्थानकांदरम्यान सेवा सुरू करण्याचे नियोजन केले होते. मात्र, आता आणखी पाच स्थानकांचे काम पूर्ण झाले असून, त्यांची तपासणी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून पुढील आठवड्यात होणार आहे.

मेट्रो सेवेचे उद्घाटन करण्याविषयी पीएमआरडीएने राज्य सरकारला पत्र लिहिले होते. राज्य सरकारकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटनाचे नियोजन करण्यात आले. यासाठी पंतप्रधान कार्यालयाला पत्रही लिहिण्यात आले. मात्र, पंतप्रधानांची वेळ न मिळाल्याने हे उद्घाटन लांबणीवर पडले. दरम्यानच्या काळात या मेट्रोच्या आणखी पाच स्थानकांचे काम पूर्ण झाले. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त पुढील आठवड्यात या स्थानकांची तपासणी करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयानेही टप्प्याटप्प्याने मेट्रो सेवा सुरू करण्याऐवजी पूर्ण मार्गावर सेवा सुरू करावी, अशी सूचना केली. त्यामुळे माण ते जिल्हा न्यायालय असा संपूर्ण मेट्रो मार्ग सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

प्रवासाचा वेळ वाचणार

सुरूवातीला मेट्रो सेवा ही माण ते बालेवाडी या १२ स्थानकांदरम्यान सुरू करण्याचे नियोजन होते. परंतु, आता सुरूवातीच्या माण स्थानकापासून अखेरच्या जिल्हा न्यायालय स्थानकांपर्यंत मेट्रो सेवा सुरू होणार आहे. यामुळे पुण्यातून हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमध्ये दररोज प्रवास करणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांचा प्रवास सुकर होणार आहें. सध्या या प्रवासासाठी दीड ते दोन तासांचा वेळ लागतो. मेट्रोमुळे हा वेळ केवळ ४५ मिनिटांवर येणार आहे.

सेवा सुरू होणारी स्थानके

माण, एमआयडीसी सर्कल, माण बस डेपो, हिंजवडी फेज-२ सर्कल २, हिंजवडी फेज-२ सर्कल १, पद्मभूषण चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, हिंजवडी फेज-१, वाकड चौक, शिवछत्रपती क्रीडा संकुल (म्हाळुंगे), मिटकॉन बालेवाडी, आर.के.लक्ष्मण संग्रहालय (बालेवाडी), औंध, सकाळनगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कृषी महाविद्यालय, जिल्हा न्यायालय या १७ स्थानकांवरील या महिन्यात सेवा सुरू होणार आहे. त्यानंतर बालेवाडी हाय स्ट्रीट, बालेवाडी फाटा, बाणेर गाव, बाणेर-पाषाण लिंक रोड, भोसलेनगर आणि शिवाजीनगर ही स्थानके येत्या डिसेंबरपर्यंत सुरू होतील.

पुणेरी मेट्रो

माण ते जिल्हा न्यायालय

एकूण लांबी – २३.३ किलोमीटर

एकूण स्थानके – २३

सेवा सुरू होणारी स्थानके – १७

सेवा सुरू – सप्टेंबरच्या अखेरीस

सर्व स्थानके डिसेंबरअखेर सुरू

पुणेरी मेट्रो सेवा लवकरात लवकर सुरू करण्यास आमचे प्राधान्य आहे. मेट्रो सेवा टप्प्याटप्प्यात सुरू करण्याऐवजी पूर्ण मार्ग सुरू करण्यात येणार आहे. या मार्गावर माण ते जिल्हा न्यायालय अशी संपूर्ण सेवा सुरू होईल. एकूण १७ मेट्रो स्थानकांवर सेवा सुरू केली जाईल. उर्वरित सहा स्थानकांची कामे पूर्ण करून त्यावरील सेवा डिसेंबरअखेरपर्यंत सुरू करण्याचे आमचे नियोजन आहे, असे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.