पुणे : पुणेकरांसह लाखो आयटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सेवा आता सुरू होणार आहे. या मार्गावरील सेवेला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी मंजुरी दिल्याने सेवा सुरू होण्याचा मार्ग खुला झाला होता. त्यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) या मेट्रो मार्गाचे उद्घाटन करण्यासाठी राज्य सरकारला पत्र लिहिले आहे. राज्य सरकारकडून उद्घाटनाचा अधिकृत मुहूर्त लवकरच जाहीर केला जाण्याची शक्यता असून १५ ऑगस्टला उद्घाटन होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हिंजवडी आयटी पार्कला पुण्याच्या मध्यवर्ती भागाशी जोडणाऱ्या पुणेरी मेट्रोची सेवा सुरु होण्याची प्रतीक्षा पुणेकरांसह लाखो आयटी कर्मचाऱ्यांना आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयांतर्गत कार्यरत मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीएमआरएस) माण स्थानक ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय (बालेवाडी) या १२ स्थानकांदरम्यानच्या टप्प्यावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यास गेल्या महिन्यात मंजुरी दिली. त्यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने राज्य सरकारला पत्र लिहिले आहे. यात मेट्रोच्या उद्घाटनाची तारीख निश्चित करण्याची विनंती करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून लवकरच उद्घाटनाचा मुहूर्त जाहीर केला जाणार आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्टला उद्घाटन करण्याचे नियोजन केले जात आहे.

पहिला टप्पा सुरु होणार

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो दोन टप्प्यात सुरू होणार आहे. पहिला टप्पा मान ते बालेवाडी आणि दुसरा टप्पा बाणेर हायस्ट्रीट ते शिवाजीनगर असा असेल. माण ते बालेवाडी १२ स्थानकांदरम्यानच्या सेवेला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी २३ जुलैला तात्पुरते प्राधिकरण प्रदान केले आहे. या मंजुरीमुळे सीबीटीसी सिग्नलिंग प्रणालीअंतर्गत एटीपी मोडवर मेट्रो ताशी ८० किलोमीटर या कमाल वेगाने धावू शकणार आहे. सर्व वैधानिक तपासण्या, चाचण्या आणि सुरक्षा मानकांची पूर्तता झाल्यानंतरच ही मंजुरी देण्यात आली आहे. सुमारे १३ किलोमीटर लांबीचा हा दुहेरी मार्ग ७५० व्होल्ट डीसी थर्ड रेल ट्रॅक्शन प्रणालीवर कार्यरत राहणार आहे.

सुरक्षा आयुक्तांकडून तपासणी

मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी ५ ते ८ जुलै या कालावधीत पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या मार्गाची सखोल पाहणी केली होती. प्राथमिक तपासणी आणि त्यानंतरच्या आढाव्यादरम्यान सुरक्षा आयुक्तांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवरील पूर्तता अहवाल कंपनीने सादर केला. प्रत्यक्ष मंजुरी देण्यापूर्वी या मार्गावर मेट्रोची निश्चिती चाचणी यशस्वीरीत्या पार पडली.

लवकरच निर्णय अपेक्षित

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील सेवा सुरू करण्याबाबत राज्य सरकारला पत्र लिहिले आहे. राज्य सरकारकडून उद्घाटनाची तारीख निश्चित केली जात आहे. ही तारीख निश्चित होऊन लवकरच या मार्गावरील सेवा सुरू होईल, अशी माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.