पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सोमवारी (१३ एप्रिल) हिंजवडी येथील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करून ते जमीनदोस्त केले. महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी अनधिकृत बांधकामे आणि होर्डिंगवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, अतिक्रमण निर्मूलन विभागाने ही मोहीम तीव्र केली.
हिंजवडी (ता. मुळशी) येथील गट क्रमांक २०६ मधील अंदाजे १२५० चौरस फूट क्षेत्रावर उभारण्यात आलेले होर्डिंगचे लोखंडी सांगाडे (फ्रेम) नियमबाह्य असल्याचे पाहणीत आढळले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. संबंधित होर्डिंगसाठी कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती, असे ‘पीएमआरडीए’कडून सांगण्यात आले.
दरम्यान, अनधिकृत होर्डिंगप्रकरणी एक महिना ते तीन वर्षांपर्यंत कारावास आणि पाच हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. ‘संबंधितांनी स्वतःहून अनधिकृत होर्डिंग काढून घ्यावीत, अन्यथा प्राधिकरणाकडून होणाऱ्या कारवाईचा खर्च आणि दंड वसूल केला जाईल,’ असा इशारा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रभारी सहआयुक्त हिंमत खराडे यांनी दिला आहे.
कोट
ज्या होर्डिंगधारकांकडे परवानगी नाही, त्यांनी तातडीने अर्ज करून प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा येत्या काळात संपूर्ण पीएमआरडीए हद्दीत अशीच कारवाई सुरू राहील. डाॅ. अभिजीत चौधरी, महानगर आयुक्त, पीएमआरडीए
