पिंपरी : हिंजवडी आयटी पार्कमधील एका कंपनीने शेकडो सुशिक्षित बेरोजगार तरुण पदवीधरांना नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना गंडवल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात सांगितले आहे. याप्रकरणात ३५७ पीडितांची ६ कोटी ४९ लाख ९६ हजार ७३१ रुपयांची फसवणूक झाली आहे. कंपनीच्या संस्थापकांची १ कोटी २७ लाख २५ हजार ७८० रुपयांची मालमत्ता आतापर्यंत जप्त करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
आमदार शंकर जगताप यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून हिंजवडी आयटी पार्कमधील एका कंपनीने बेरोजगार तरुण पदवीधारकांच्या केलेल्या फसवणुकीचा मुद्दा सभागृहासमोर मांडला होता. हिंजवडी आयटी पार्क येथील एका कंपनीने ऑगस्ट २०२५ मध्ये अभियंत्यांना मोठ्या वार्षिक पगाराचे अमिष दाखवले. तसेच उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात आगऊ रक्कम स्वीकारून त्यांना नोकरीला लावतो असे सांगून विश्वास संपादन केला. नियुक्तीपूर्वी ट्रेनिंग आणि इतर कारणांसाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून एक लाख ते अडीच लाख रुपयांपर्यंतची रक्कम कंपनीच्या बँक खात्यावर भरून घेण्यात आली. त्यानंतर काही महिने ऑनलाइन काम करून घेतले. परंतु, प्रत्यक्षात पगार दिला नाही.
शेवटी पात्रता परीक्षा किंवा मुलाखत (इंटरव्ह्यूमध्ये) नापास झाल्याचे कारण देऊन अनेक विद्यार्थ्यांना कंपनीत रुजू करून घेण्यास नकार दिला. अभियंत्यांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणात हिंजवडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत शासनाने चौकशी केली का, चौकशीत काय आढळून आले. फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची रक्कम परत मिळण्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आले असे विविध प्रश्न विचारले होते. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिले आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त (परिमंडळ २) यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आली आहे.
आरोपींची सव्वा कोटींची मालमत्ता जप्त
या प्रकरणात आतापर्यंत ३५७ पीडितांची ६ कोटी ४९ लाख ९६ हजार ७३१ रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आले आहे. संबंधित कंपनीचे संस्थापक आणि कार्यरत कर्मचारी यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करत असतानाच त्यांची १ कोटी २७ लाख २५ हजार ७८० रुपयांची मालमत्ता आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे. यामध्ये सुमारे ४८ लाख २५ हजार ७८० रुपये किमतीच्या जंगम मालमत्तेचा आणि ७९ लाख रुपये किमतीच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. फसवणुकीच्या पैशातून घेतलेल्या या मालमत्तेबाबत पुढील कायदेशीर कारवाई सुरु असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आयटी क्षेत्रातील तरुणांची होणारी ही फसवणूक अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणाचा तपास केवळ कागदावर राहू नये, तर प्रत्येक पीडित विद्यार्थ्याला त्याचे हक्काचे पैसे परत मिळावेत आणि अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या टोळ्यांवर जरब बसवावी, हीच प्रमुख मागणी आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे एसआयटीच्या माध्यमातून आता या प्रकरणाचा छडा लागेल, असा आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केला.
