पुणे : ‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का, शाळेभोवती तळे साचून सुटी मिळेल का,’ या बालगीताप्रमाणे हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कची गेल्या वर्षी पावसाळ्यात स्थिती झाली होती. आयटी कंपन्यांवर यंदा पावसाळ्यात कर्मचाऱ्यांना सुटी देण्याची वेळ येऊ नये, यासाठी एमआयडीसीने आयटी पार्क मध्ये मोठ्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यातील ९० टक्के कामे पूर्ण झाली असून यंदा आयटी पार्कमधील रस्ते जलमार्ग बनणार नाहीत याची दक्षता घेण्यात आली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कची जलकोंडी होऊ नये, यासाठी उपाययोजनांना गती मिळाली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) नालेसफाईसह नवीन सांडपाणी वाहिन्यांची कामे हाती घेतली आहेत. ही कामे ९० टक्के पूर्ण झाली असून, या पावसाळ्यात पाणी साचू नये, या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. याचबरोबर वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. ‘एमआयडीसी’तील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयटी पार्कमध्ये पदपथांच्या खाली नाले आहेत. हे नाले अनेक ठिकाणी तुंबले होते. ते मोकळे करण्याचे काम ‘एमआयडीसी’ने हाती घेतले आहे. हे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. त्यात आयटी पार्क टप्पा एकमध्ये ९ किलोमीटर नालेसफाई करण्यात आली. तसेच, टप्पा दोनमध्ये ७ किलोमीटर नाल्यांची सफाई करण्यात आली. टप्पा तीनमध्ये ८.५ किलोमीटर नालेसफाई करण्यात आली असून, २ हजार २०० मीटर लांबीच्या एका मोठ्या नाल्याचीही सफाई करण्यात आली.

आयटी पार्कमध्ये तीन ठिकाणी भुयारी सांडपाणी वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. रस्त्यांवर पावसाचे पाणी येऊ नये, यासाठी रस्त्यांच्या खालून या वाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. त्यात डोहलर चौक, एम्पोरिस कंपनी, प्राइम स्पेस कंपनी या ठिकाणांचा समावेश आहे. याचबरोबर विप्रो सर्कल येथेही सांडपाणी वाहिनीची सफाई करण्यात आली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील बुजविलेले नालेही मोकळे करण्यात आले आहेत. यामुळे डोंगरउतारावरून वाहून येणारे पावसाचे पाणी वाहून थेट मुठा नदीला जाऊन मिळणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

मेट्रो मार्गावरील रस्त्याला गती

हिंजवडी ते शिवाजीगर मेट्रोचा ९ किलोमीटर मार्ग आयटी पार्कमध्ये ‘एमआयडीसी’च्या हद्दीतून जातो. मेट्रो स्थानक दोन (क्वाड्रन बिझनेस पार्क) ते स्थानक ८ (कोर्टयार्ड बाय मॅरिएट) या दरम्यानचा नऊ किलोमीटर रस्ता ‘एमआयडीसी’चा आहे. मेट्रोच्या कामासाठी तो ‘पीएमआरडीए’कडे हस्तांतरित करण्यात आला होता. आता या रस्त्याचे काम वेगाने सुरू असून, तो सहापदरी करण्यात येत आहे. त्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

पाणी साचणार नाही

आयटी पार्कमधील पावसाळापूर्व कामे वेगाने सुरू आहेत. तसेच, पावसाळ्यात नाले तुंबल्यास तातडीने उपाययोजना करण्याची तयारीही करण्यात आली आहे. रस्त्यावर पाणी साचू नये, यासाठी काही ठिकाणी भुयारी सांडपाणी वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. यामुळे यंदा पावसाळ्यात आयटी पार्कमध्ये रस्त्यावर पाणी साचण्याची समस्या निर्माण होणार नाही, अशी माहिती एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र तोतला यांनी दिली.

आयटी पार्कमधील पावसाळापूर्व कामे

  • सुमारे २५ किलोमीटर नालेसफाई
  • तीन ठिकाणी भुयारी सांडपाणी वाहिन्या
  • मेट्रो मार्गावरील ९ किलोमीटर रस्ता सहापदरी
  • पीएमआरडीए हद्दीतील नालेही मोकळे
  • पावसाचे पाणी विनाअडथळा मुठा नदीपर्यंत