Hinjawadi IT Park Drainage Issue: हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कचे गेल्या वर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचून वॉटर पार्कमध्ये रूपांतर झाले होते. आयटी पार्कमधील टप्पा क्रमांक दोनमधील मुख्य रस्त्यावर डोहलर चौकासह काही ठिकाणी प्रामुख्याने ही समस्या निर्माण झाली होती. आता या परिसरात मोकळा श्वास घेणे अशक्य बनले आहे. तिथे फिरताना नाकाला रुमाल लावल्याशिवाय गत्यंतर नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे आयटी पार्क आता ‘दुर्गंधी पार्क’ बनल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
आयटी पार्क टप्पा क्रमांक दोनमधील मुख्य रस्त्यावर काही ठिकाणी पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे अनेक कंपन्या आणि रहिवाशांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) तक्रार केली आहे. या ठिकाणी पसरणाऱ्या दुर्गंधीचा त्रास नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचबरोबर सांडपाणी तुंबत असल्याने आरोग्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील निवासी प्रकल्पांतून हे प्रक्रिया न केलेले सांडपाणी गटारात सोडण्यात येत आहे. या निवासी प्रकल्पांचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी एमआयडीसीने पीएमआरडीएकडे पत्राद्वारे केली आहे. याचबरोबर तुंबलेले नाले खुले करण्याचे कामही एमआयडीसी करीत आहे. दरम्यान, याप्रकरणी पीएमआरडीएचे आयुक्त अभिजित चौधरी आणि विकास परवानगी व नियोजन विभागाचे संचालक अविनाश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळू शकला नाही.
पत्रात नेमके काय?
एमआयडीसीने पत्रात म्हटले आहे, की आयटी पार्कमधील टप्पा दोनमधील मेट्रो मार्ग असलेल्या मुख्य रस्त्याच्या बाजूला ग्रँड हाय स्ट्रीट मॉलच्या विरुद्ध बाजूला असलेल्या पावसाळी गटाराच्या चेंबरमध्ये पीएमआरडीए हद्दीतील काही निवासी प्रकल्प त्यांचे सांडपाणी सोडत आहेत. त्यामुळे तेथील ९०० मिलिमीटर व्यासाच्या वाहिन्या तुंबत आहेत. याच रस्त्यावर मेट्रो स्थानक क्रमांक दोनशेजारी पीएमआरडीए हद्दीतील आणखी एका निवासी प्रकल्पाने सांडपाणी थेट पावसाळी गटारात सोडले आहे. तसेच, या रस्त्यावर मॅकडोनाल्ड रेस्टॉरंटजवळ पीएमआरडीए हद्दीतील काही भूखंडधारक सांडपाणी सोडत आहेत. त्यामुळे गटारे तुंबून दुर्गंधी पसरत आहे. एमआयडीसीकडून आयटी पार्कमध्ये पावसाळ्यात पाणी साचू नये, यासाठी कामे सुरू आहेत. त्यावर याचा परिणाम होत आहेत. त्यामुळे अशा प्रकारे सांडपाणी सोडण्यास संबंधित कंपन्या आणि निवासी प्रकल्पांना मनाई करावी.
पाहणीनंतर निर्णय
हिंजवडी आयटी पार्कमधील टप्पा क्रमांक दोनमध्ये मुख्य रस्त्यावर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिक आणि कंपन्यांकडून आल्या होत्या. घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता पीएमआरडीए हद्दीतील कंपन्या आणि निवासी प्रकल्पांतून सांडपाणी थेट पावसाळी गटारात सोडले जात असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पीएमआरडीएला पत्र लिहून योग्य कार्यवाही करण्याची विनंती केली आहे, अशी माहिती एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र तोतला यांनी दिली.
टप्पा दोनमधील मुख्य रस्त्यावरील दुर्गंधीची ठिकाणे
- ग्रँड हाय स्ट्रीट मॉलसमोर
- मेट्रो स्थानक क्रमांक दोनच्या शेजारी
- मॅकडोनाल्ड रेस्टॉरंटजवळ
पावसाळी कामात अडथळा
आयटी पार्कमध्ये गेल्या वर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. हे पाणी साचू नये, यासाठी एमआयडीसीकडून उपाययोजना सुरू आहेत. आता पावसाळी गटारात सांडपाणी सोडले जात असल्याने ती तुंबत आहेत. त्यामुळे या कामात अडथळे निर्माण होत आहेत. पावसाळ्याआधी ही कामे पूर्ण करण्याचे एमआयडीसीचे नियोजन असून, ते यामुळे लांबणीवर पडत आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात आय़टी पार्कमध्ये गेल्या वर्षीसारखी जलकोंडी होण्याची भीत व्यक्त होत आहे.
