पुणे : हिंजवडी आयटी पार्कलाही आता एलपीजी गॅस टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. आयटी पार्कमधील एका बड्या कंपनीच्या कॅम्पसमध्ये एलपीजी पुरवठ्यात तात्पुरता खंड पडल्याने कॅम्पसमधील फूड कोर्ट आणि कॅफेटेरियामध्ये अन्नपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना घरून डबा आणण्याच्या सूचनाही कंपनीने केल्या आहेत. यासंदर्भात कंपनीने कर्मचाऱ्यांना अंतर्गत ई-मेलद्वारे माहिती दिली आहे.

कंपनीने कर्मचाऱ्यांना पाठविलेल्या ई-मेलनुसार, एलपीजी पुरवठ्यातील अडथळ्यामुळे कॅम्पसमधील फूड कोर्टमध्ये नियमित स्वयंपाक करणे सध्या शक्य होत नसल्याने कॅफेटेरियामध्ये मर्यादित खाद्यपदार्थ उपलब्ध राहणार आहेत. परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत बाहेरील स्वयंपाकघरांमधून अन्न मागवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांना शक्य असल्यास घरून डबा आणण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच कार्यालयीन कार्यक्रम, बैठका किंवा इतर कोणत्याही उपक्रमांसाठी केटरिंगची आवश्यकता भासेल असे कार्यक्रम सध्या टाळावेत, असेही सांगण्यात आले आहे. सध्या एलपीजी पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असून परिस्थिती लवकरच सामान्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तोपर्यंत कॅम्पसमधील अन्नसेवा मर्यादित स्वरूपात सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांची गैरसोय

या आयटी कंपनीच्या पुण्यातील कॅम्पसमध्ये दररोज हजारो कर्मचारी कामासाठी उपस्थित राहत असल्याने अन्नपुरवठ्यातील या अडचणीचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात आहे. विशेषतः कंपनीने ‘वर्क फ्रॉम होम’ बंद करून ‘रिटर्न टू ऑफिस’ धोरण स्वीकारल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक असताना अशा परिस्थितीत त्यांना गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचेही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

‘वर्क फ्रॉम होम’ची मागणी

सध्याच्या परिस्थितीत कंपन्यांनी तात्पुरत्या स्वरूपात घरून काम (वर्क फ्रॉम होम) करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिल्यास कर्मचाऱ्यांवरील ताण आणि गैरसोय काही प्रमाणात कमी होऊ शकते. मोठ्या कॅम्पसमध्ये दररोज हजारो लोकांसाठी अन्नव्यवस्था करणे हे आव्हानात्मक असते आणि पुरवठा साखळीत अडथळे निर्माण झाल्यास त्याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांवर होतो. यामुळे कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ द्यावे, अशी मागणी फॉर्म फॉर आयटी एम्प्लॉईजने केली आहे.

हॉटेलही बंद

व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरचा पुरवठा सध्या बंद करण्यात आला आहे. सिलिंडर मिळत नसल्याने शहरातील अनेक हॉटेल बंद पडू लागली आहेत. सिलिंडरची उपलब्धता असलेली मर्यादित स्वरूपात खाद्यपदार्थ करून व्यवसाय बंद करण्याचे एक दिवस पुढे ढकलत आहेत. अशा परिस्थितीत आता अन्नपुरवठा मर्यादित केल्याने अविवाहित कर्मचारी तसेच पुण्यात कुटुंबीय नसलेले कर्मचारी यांची अडचण निर्माण झाली आहे.