पुणे : हिंजवडी आयटी पार्कमध्ये आता पोहणारे पादचारी, तरंगणाऱ्या दुचाकी अन् पाणबुडी मोटारी दिसल्या तर आश्चर्य वाटायला नको. कारण आयटी पार्कमध्ये यंदा पावसाळ्याआधीच ‘वॉटरपार्क सीझन’ सुरू झाला आहे. यंदा अवकाळी पावसातच हे चित्र दिसू लागले आहे. रस्त्यांवर साचलेले पाणी, वाहतुकीचा ठप्प वेग, वाहनांचे बिघाड आणि पादचाऱ्यांची गैरसोय अशा समस्यांनी आयटी कर्मचाऱ्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे.

आयटी पार्कमधील दयनीय पायाभूत सुविधा आणि पावसामुळे उडणारा बोजवारा यावरून शासकीय यंत्रणांवर टीकेची झोड उठली आहे. फोरम फॉर आयटी एम्प्लॉईजने समाज माध्यमावरून आयटी पार्कमधील दुरवस्थेचे उपरोधिक चित्र मांडणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनाही टॅग करण्यात आले.

या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पुण्यातील वार्षिक ‘वॉटरपार्क सीझन’ अधिकृतरित्या सुरू झाला आहे. त्यात नवीन राईडचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये तरंगणाऱ्या दुचाकी, पोहणारे पादचारी आणि पाणबुडी मोटारी या राईड आहेत. दरवर्षी हेच चित्र कायम आहे. आपण शहर उभे करत आहोत की वॉटर पार्क हा प्रश्न उपस्थित होत आहे. आयटी कर्मचारी सातत्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्याकडे हे मुद्दे उपस्थित करीत आहेत, तरीही कार्यवाही होताना दिसत नाही.

हिंजवडी आयटी पार्क हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आयटी हबपैकी एक मानला जातो. दररोज लाखो कर्मचारी येथे ये-जा करतात. मात्र, मुसळधार पावसात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने आयटी कर्मचाऱ्यांना कार्यालयात पोहोचण्यासाठी तासनतास लागतात. काही ठिकाणी तर वाहने बंद पडण्याच्या घटना घडत आहेत.

आयटी कर्मचाऱ्यांनी यापूर्वीही एमआयडीसी आणि पीएमआरडीए यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. तसेच, राज्य सरकार आणि संबंधित विभागांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणीही होत आहे.

मुख्य समस्या कोणत्या?

अपुऱ्या सांडपाणी वाहिन्या
रस्त्यांचे अनियोजित बांधकाम
खड्डेमय व जलमय रस्ते
वाढती वाहतूक कोंडी
अपुऱ्या पायाभूत सुविधा

उपाययोजना काय?

हिंजवडी आयटी पार्कसारख्या वेगाने वाढणाऱ्या परिसरात पायाभूत सुविधा त्याच वेगाने विकसित झाल्या नाहीत. परिणामी, पावसाचे पाणी साचणे ही वार्षिक समस्या बनली आहे. या परिसरासाठी आधुनिक आणि उच्च क्षमतेची सांडपाणी यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. याचबरोबर रस्त्यांची पुनर्रचना करून योग्य उतार आणि पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.

आयटी कंपन्यांशी समन्वय साधून कामाच्या वेळांमध्ये लवचिकता ठेवायला हवी. दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.