पिंपरी : शिवजयंती निमित्त हिंजवडी मधील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. गुरुवारी (१९ फेब्रुवारी) दुपारी तीन ते रात्री अकरा या कालावधीत हा बदल असेल. याबाबतचे आदेश पोलीस उपायुक्त वाहतूक विवेक पाटील यांनी दिले आहेत.
हिंजवडीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिर हिंजवडी गावठाण ते शिवाजी महाराज चौक हिंजवडी या मार्गावर मिरवणूक काढली जाणार आहे. या मिरवणुकीत हजारो नागरिक सहभागी होणार असून संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. कस्तुरी चौक ते छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद असेल. या मार्गावरून मारुंजी वाय जंक्शन येथून येणारी वाहने कस्तुरी चौक, विनोदे वस्ती, इंडियन ऑइल चौक मार्गे जातील.
मेझा नऊ चौकाकडून हिंजवडी गावठाणकडे जाणारी वाहतूक श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सरळ पुढे जाऊन इंडियन ऑइल चौक, कस्तुरी चौक, विनोदे वस्ती मार्गे जाईल. शिवाजी चौकाकडून यु टर्न घेऊन जांभुळकर जिम चौक मार्गे हिंजवडी गावठाणकडे जाणारी वाहतूक जांभुळकर जिम चौकातून सरळ पुढे इंडियन ऑइल चौक, कस्तुरी चौक, विनोदे वस्ती चौक मार्गे जाईल. मेझा नऊ चौकाकडून श्री शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या दोन लेन पैकी डावी लेन बंद करून सर्व वाहतूक उजव्या बाजूच्या लेनने सुरू राहील.
वाकडमध्ये टेम्पो चालकाच्या निष्काळजीपणामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी
संतोषनगर थेरगाव येथील भुयारी मार्गाजवळ एका टेम्पो चालकाने आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने चालवून दुचाकीस्वाराला धडक दिल्याने अपघात झाला. ही घटना रविवारी (१५ फेब्रुवारी) सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास सर्व्हिस रोडवर घडली. या प्रकरणी ३३ वर्षीय तरुणाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आपल्या दुचाकीवरून कामावरून घरी जात होते. त्यावेळी भुयारी मार्गातून समोरून येणाऱ्या टेम्पो चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आणि वेगात वाहन चालवून फिर्यादीच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात फिर्यादीच्या वाहनाचे नुकसान झाले असून ते स्वतः गंभीर जखमी झाले आहेत. वाकड पोलीस तपास करत आहेत.
चाकणमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
चाकण बस स्टॉप शेजारील एका शिवभोजन थाळी केंद्रात बेकायदेशीरपणे जुगार खेळणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई करून मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सोमवारी (१६ फेब्रुवारी) करण्यात आली. या प्रकरणी पोलीस शिपाई सुनील भागवत यांनी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे प्रतिबंधित जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिथे छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी १५ हजार ६०० रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य आणि रोकड जप्त केली आहे. चाकण दक्षिण पोलीस तपास करत आहेत.
आळंदीत बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकास अटक
आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या पुलाजवळ दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने लोखंडी गुप्ती बाळगणाऱ्या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (१६ फेब्रुवारी) सिद्ध बेट चौकात करण्यात आली. याबाबत ज्ञानेश्वर गिरी यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहन अनिल दोडे (२०, देहुफाटा, आळंदी, मूळ – घोलपवाडी, बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात शस्त्र बंदीचे आदेश लागू असताना आरोपीने ५०० रुपये किमतीची लोखंडी गुप्ती आणि ३० हजार रुपये किमतीची दुचाकी जवळ बाळगली होती. बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून शस्त्र जप्त करण्यात आले आहे. आळंदी पोलीस तपास करत आहेत.

