पुणे : ‘हिंजवडी आयटी पार्क परिसरातील अंतर्गत रस्त्यांच्या विकासासाठी ४२६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) या बाबत तातडीने कार्यवाही सुरू करावी. ज्या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या अधिक आहे, तेथे आवश्यक कामे प्राधान्याने सुरू करावीत,’ असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी शुक्रवारी दिले.
हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, मेट्रोशी जोडणी, सार्वजनिक वाहतूक, पाणीपुरवठा आणि अन्य पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर एकात्मिक उपाययोजना करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची पहिली बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्या वेळी त्यांनी हे आदेश दिले. आमदार शंकर मांडेकर, बाबाजी काळे, अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका वाहतूक विभागाचे उपायुक्त विक्रांत देशमुख तसेच हिंजवडी, माण आणि वारुंजी गावांतील नागरिक या वेळी उपस्थित होते.
‘हिंजवडी परिसरातील मेट्रो स्थानकांशी जोडणीसाठी सुमारे १९.१ किलोमीटर लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी रस्त्यांचा विकास प्रस्तावित आहे. यामध्ये पीएमआरडीए क्षेत्रातील सुमारे ७.२२५ किलोमीटर आणि एमआयडीसी क्षेत्रातील सुमारे ११.९७४ किलोमीटर रस्त्यांचा समावेश आहे. मेट्रो स्थानकांभोवतीच्या या रस्त्यांचा विकास करताना केवळ वाहनांची वाहतूक न पाहता पादचारी आणि सायकलस्वारांसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे,’ असे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.
‘सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने तातडीने वाहतूक अभ्यास करून त्याआधारे उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. हिंजवडी परिसरात ‘ट्रान्झिट हब’ विकसित करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात यावेत. ‘पीएमपीएमएल’च्या डेपोसाठी उपलब्ध जागेचा उपयोग करण्याबरोबरच अन्य पर्यायी ठिकाणी डेपो उभारता येईल का, या बाबत संबंधित यंत्रणांनी अहवाल सादर करावा,’ असे त्यांनी सांगितले.
अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या जड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या.
चौकट
जोडरस्त्यांचा विकास
‘‘लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी’अंतर्गत मेट्रो स्थानकांपासून साधारण ५०० मीटर ते १.५ किलोमीटर परिसरातील जोडरस्ते विकसित करण्यात येणार आहेत. पक्के पदपथ, सायकल मार्ग, टॅक्टाइल मार्ग, सुरक्षित रस्ता ओलांडण्याची व्यवस्था, ‘स्ट्रीट लाइट’ आणि दिशादर्शक फलक उभारण्याचा प्रस्ताव आहे. दिव्यांग नागरिकांसाठीही हे मार्ग सुलभ असतील, याची दक्षता घेण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. मेट्रो स्थानकांजवळ नियोजित पार्किंग व्यवस्था निर्माण करून रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यावरही भर देण्यात येणार आहे.
मुळशी धरणातील पाण्यासाठी प्रयत्न
हिंजवडी परिसरातील पाणीपुरवठ्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडविण्यासाठी मुळशी धरणातील पाणी उपलब्ध करून देण्याबाबत ‘टाटा कंपनी’सोबत चर्चा सुरू असून, याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तसेच, परिसरातील सुरक्षितता वाढविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित सीसीटीव्ही कॅमेरे पोलिस विभागामार्फत बसविण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.
हिंजवडी परिसरातील विविध विकासकामांच्या प्रगतीची पाहणी करण्यासाठी पुढील आठवड्यात प्रत्यक्ष भेट दिली जाणार आहे. त्यापूर्वी संबंधित सर्व विभागांना बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांनुसार कामांना तातडीने सुरुवात करून कार्यवाहीचा अहवाल सादर करण्यात येईल. – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी
