Hinjewadi IT Park Traffic Jam Updates: हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. वाहतूक कोंडीत रोज तासनतास आय़टी कर्मचारी आणि नागरिक अडकून पडल्याचे चित्र आयटी पार्कमध्ये नित्याचेच. आता ही परिस्थिती बदलण्यासाठी पावले पडू लागली आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आयटी पार्कमधील कोंडी सोडविण्यासाठी सहा जोडरस्ते विकसित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात आयटी पार्कमधील प्रवासाचा वेळ कमी होणार आहे.

हिंजवडी आयटी पार्कचा वेगाने विस्तार होत असताना त्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विस्तार झाला नाही. याचवेळी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने आयटी पार्कमधील रस्ते अपुरे पडू लागले. त्यातूनच वाहतूक कोंडीची समस्या बिकट बनत गेली. आता ही समस्या सोडविण्यासाठी पीएमआरडीएने आयटी पार्क परिसरातील सहा जोडरस्ते विकसित करण्याचे पाऊल उचलले आहे. पीएमआरडीएकडून या रस्त्यांच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. काही ठिकाणी संयुक्त मोजणीही सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन असून, त्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.

पीएमआरडीएने हाती घेतलेल्या नवीन जोडरस्त्यांमध्ये सूर्या हॉस्पिटल ते ठाकरवस्ती, ठाकरवस्ती ते माणगाव, नांदेगाव ते माणगाव, लक्ष्मी चौक-हिंजवडी-कोलते पाटील सोसायटी, शनिमंदिर वाकड ते मारुंजी, जगताप चौक ते शिंदे वस्ती मारूंजी यांचा समावेश आहे. या नवीन जोडरस्त्यांमुळे हिंजवडी आयटी पार्क परिसरात पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहेत. त्यातून वाहतूक कोंडी कमी होऊन वाहतुकीचा वेग वाढेल. यामुळे आयटी कर्मचाऱ्यांसह नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीत वाया जाणारा तासभर वेळ वाचणार आहे.

आयुक्तांकडून आढावा

हिंजवडी आणि लगतच्या गावांमध्ये पावसाळ्यात उद्भवणारी वाहतूक कोंडी व पाणी साचण्याच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश पीएमआरडीए आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत. हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरात पावसाळ्यापूर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

हिंजवडी आयटी पार्क आणि औद्योगिक वसाहतींमधील वाहनांची मोठी वर्दळ लक्षात घेता, मर्सिडीज शोरूम (राष्ट्रीय महामार्ग ४८) ते हिंजवडी टप्पा-१ या जोडरस्त्याचा विकास वेगाने करण्याबाबत नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच लक्ष्मी चौक, कोलते-पाटील रस्ता आणि नेरे-दत्तवाडी-जांबे येथील रस्त्यांचे रुंदीकरण व विकासाचा आढावाही घेण्यात आला. पीएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या ‘प्राईड रोड’च्या कामाची आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा दर्जा आणि प्रगती तपासली.