पिंपरी : हिंजवडी आयटी पार्कमध्ये सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी फेज १ ते फेज ३ या अवघ्या दीड ते दोन किलोमीटर रस्त्याच्या अंतरासाठी तब्बल दीड तासाचा अवधी लागतो. प्रचंड वाहतुक कोंडी आणि रस्त्यावरील खड्डे यामुळे या रस्त्यावरील रूग्णालयात एखाद्या रूग्णाला न्यायचे असल्यास रूग्णालयापर्यंत रूग्ण पोहोचू शकणार नाही, अशी दयनीय अवस्था असल्याची व्यथा परिसरातील आयटीएन्स आणि सोसायटीधारकांनी शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यासमोर मांडली.

तसेच, आमच्या विविध मागण्यांसाठी ६ सप्टेंबर रोजी तीव्र आंदोलन करणार असल्याची आयटीएन्सनी घोषणा केली. आदित्य ठाकरे यांनीही त्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठींबा दर्शविला. चाकण औद्योगिक परिसरातील सुमारे २० कंपन्यांनी खराब रस्ते, प्रचंड वाहतूक कोंडी आणि इतर पायाभुत सुविधांच्या अभावामुळे इतर ठिकाणी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभुमीवर आमदार आदित्य ठाकरे
यांनी स्वातंत्र्यदिनी चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची पाहणी करून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला होता. त्यानंतर त्यांना हिंजवडी आयटी पार्कमधील आयटीयन्सनी मॅसेज करून हिंजवडीतील विविध समस्यांबाबत आपण येथेही पाहणी दौरा करावा, अशी विनंती केली होती.

त्यानुसार आमदार आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी हिंजवडीतील रस्त्यांची पाहणी केली. स्थानिक नागरिकांशी संवाद साधत आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. हिंजवडीतील मेट्रो स्टेशनचीही त्यांनी पाहणी करीत कामाचा आढावा घेतला. हिंजवडी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देत ग्रामपंचायत सदस्यांशीही त्यांनी परिसरात भेडसावणार्‍या प्रश्नांबाबत चर्चा केली.

आयटीएन्स, सोसायटीधारक यांच्यासोबत त्यांनी बैठक घेतली. बैठकीत नागरिकांनी आदित्य ठाकरे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. हिंजवडी परिसरातील आयटी कंपन्यांमध्ये सुमारे चार ते पाच लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना रस्ते, पाणी, वीज या मुलभुत सुविधा प्राधान्याने मिळणे गरजेचे आहे. मात्र, येथील रस्त्यांची दयनिय अवस्था आहे. त्यातच गर्दीच्या वेळी सकाळी आणि सायंकाळी प्रचंड वाहतुक कोंडी असते. दोन-दोन तास आम्हाला वाहतुक कोंडीत अडकून पडावे लागते. रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे फुटपाथ कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे रस्त्याने चालत जाताना जीव मुठीत धरूनच ये-जा करावी लागते, अशी व्यथा एका सोसायटीधारकाने मांडली. मागील वर्षभरात या परिसरात रस्ते अपघातात १० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी दौरे करून परिसर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी पाऊल उचलले होते. मात्र, आता पुन्हा अतिक्रमणे होऊ लागली आहेत. सोसायट्यांमधील कचर्‍याचा प्रश्नही गंभीर आहे. कचरा वेळेवर उचलला जात नाही. त्याचे विलगीकरण केले जात नाही. ग्रामपंचायतीची यंत्रणा अपुरी पडते. मुळशी धरणातून पाणी आणण्याचा विषय गेल्या कित्येक वर्षापासून चर्चेत आहे. मात्र, निर्णय काहीच होत नाही, अशी व्यथाही नागरिकांनी आदित्य ठाकरे यांच्यासमोर मांडली.

आंदोलनासाठी परवानगीची गरज नसते

प्रशासनाच्या कारभाराविरोधात आम्हाला आंदोलन करायचे आहे. मात्र, पोलीसांकडे आंदोलनासाठी परवानगी मागितल्यास नकार दिला जातो, असे बैठकीत काही आयटीएन्सनी आदित्य ठाकरे यांना सांगितले. त्यावर आदित्य ठाकरे यांनी आंदोलनासाठी कधीच परवानगी मिळत नाही. त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते. आपल्या न्याय हक्कासाठी आपल्याला आंदोलन करावेच लागते. जेन्झीने हे दाखवून दिले आहे. तुम्ही आंदोलन करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी दिला. त्यानंतर त्वरीत आयटीएन्सने आंदोलन जाहीर करीत ६ सप्टेंबर ही तारीखही घोषीत केली. तसेच, आदित्य ठाकरे यांनाही आंदोलनात सहभागी व्हावे, अशी विनंती केली. आदित्य ठाकरे यांनीही संमती दिली.