पुणे : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हिंजवडी आयटी पार्कमध्ये एक लहान मुलगा रस्त्याच्या कडेला फुगे विकत बसलेला. त्याचवेळी जड वाहनांवर निर्बंध असताना एक ट्रक भरधाव येतो. कोणाला काही कळण्याआधी त्या ट्रकची जोरदार धडक फुगे विकणाऱ्या मुलाला बसते. ही घटना तेथून जाणारे आयटी कर्मचारी पाहतात आणि तेथून पुढे सुरू होतो त्या मुलाला वाचविण्याच्या प्रवास…

हिंजवडी आयटी पार्क परिसरात रविवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास हा गंभीर अपघात घडला. रस्त्यावर फुगे विक्री करणाऱ्या १४ वर्षीय मुलाला भरभाव ट्रकने जोरदार धडक दिली. विशेष म्हणजे, त्यावेळी आयटी पार्कमध्ये जड वाहनांना प्रवेश बंदी होती. या अपघातात मुलाच्या पायाला गंभीर इजा होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. तेथून जाणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून त्याला तातडीने पिरंगुट येथील खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र तेथे त्याला दाखल करून घेण्यात आले नाही. त्यानंतर दुपारी सुमारे १२ वाजता त्याला सूस येथील दुसऱ्या खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. परंतु अतिदक्षता विभागातील (आयसीयू) बेड आणि व्हॅस्क्युलर सर्जन उपलब्ध नसल्याने तेथूनही सुमारे १२.३० वाजता त्याला तिसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले.

अखेर दुपारी सुमारे १.३० वाजता जखमी मुलाला पुण्यातील संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र येथेही शस्त्रक्रिया सुरू होण्यास विलंब झाला. आर्थिक अडचणींमुळे उपचारात अडथळा येत असल्याचे चित्र निर्माण झाले, तरीही रुग्णालयाने प्राथमिक उपचार सुरू ठेवले. या प्रकरणात फोरम फॉर आयटी एम्प्लॉईजने पुढाकार घेत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर डॉ. म्हसे यांनी तात्काळ संचेती हॉस्पिटलचे डॉ. पराग संचेती यांच्याशी समन्वय साधला. विशेष बाब म्हणजे, डॉ. पराग संचेती हे त्या वेळी दुबईमध्ये असतानाही त्यांनी वैयक्तिक लक्ष घालून उपचार त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले आणि आर्थिक कारणांमुळे मुलाला उपचार नाकारले जाणार नाहीत, याची खात्री केली.

या संवेदनशील आणि वेळेवर केलेल्या हस्तक्षेपामुळे मुलाची शस्त्रक्रिया पार पडली. अखेर ८.४० वाजता शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून सध्या मुलाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. फोरमचे सदस्य आशुतोष पांडे, प्रशांत पंडित आणि पवनजीत माने हे दुपारी ४ वाजल्यापासून संचेती हॉस्पिटलमध्ये उपस्थित राहून मुलाला योग्य उपचार मिळत आहेत की नाही, यावर लक्ष ठेवून होते. या कठीण प्रसंगी तत्परता आणि माणुसकी दाखवल्याबद्दल डॉ. योगेश म्हसे, डॉ. पराग संचेती, तसेच पोलीस प्रशासनाचे फोरमने आभार मानले आहेत.

पोलिसांकडून कारवाई

या अपघातप्रकरणी पोलिसांनीही तात्काळ कारवाई केली आहे. पोलीस उपायुक्त विवेक पाटील आणि हिंजवडी पोलीस ठाण्याच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने संबंधित ट्रक चालकास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.