हिंजवडीतील आयटी पार्क हा पायाभूत सुविधांच्या दयनीय अवस्थांमुळे गेल्या पावसाळ्यात कायम चर्चेत राहिला. यंदा पावसाळ्याआधीही हेच चित्र पुन्हा दिसू लागले आहे.
हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये गेल्या वर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते. त्यावेळी आयटी पार्कचे रुपांतर वॉटर पार्कमध्ये झाल्याची टीका करण्यात आली. त्यानंतर आयटी पार्कसह बाणेर, बालेवाडी परिसरात पावसाचे पाणी साचू नये, यासाठी विविध शासकीय यंत्रणांकडून उपाययोजना हाती घेण्यात आल्या. याचबरोबर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अनेक विकासकामे सुरू करण्यात आली. पुणे परिसरात यंदा झालेल्या पहिल्याच अवकाळी पावसात हिंजवडी आयटी पार्कसह बाणेर, बालेवाडी परिसराची दैना उडाली. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून वाहतूक कोंडी निर्माण झाली. आयटी कर्मचारी या वाहतूक कोंडीत तासभराहून अधिक काळ अडकून पडले. पावसाचे पाणी साचू नये, यासाठी विविध शासकीय यंत्रणांकडून सुरू असलेल्या उपाययोजना या निमित्ताने उघड्या पडल्या आहेत.
बाणेर, बालेवाडी परिसरात मुंबई-बंगळुरू महामार्गाच्या बाजूला सांडपाणी वाहिन्यांची कामे सुरू आहेत. त्यासाठी खोदाई करण्यात आली. अवकाळी पावसामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले. महामार्गाच्या सेवा रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी तुंबले. त्यातून मार्ग काढण्याची कसरत वाहनचालकांना करावी लागत होती. त्यामुळे वाहनांचा वेग कमी होऊन वाहतूक कोंडी झाली. या परिसरात महामार्गालगत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून अनेक कामे प्रलंबित आहेत. या कामांना वेग नसल्याचा मुद्दा याआधी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीतही उपस्थित झाला होता. त्यावेळी विभागीय आयुक्तांनी काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची तंबी दिली होती. तरीही महामार्ग प्राधिकरणाचा कामाचा वेग संथच असल्याची सद्य:स्थिती आहे.
आयटी पार्कमध्ये नैसर्गिक जलप्रवाह अडविल्याने पूरस्थिती निर्माण होत असल्याची बाब उघडकीस आली. त्यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) जलसंपदा विभागाची समिती नैसर्गिक जलप्रवाहांच्या सर्वेक्षणासाठी नेमली. याचबरोबर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) खासगी सल्लागाराची नेमणूक करून जलप्रवाहाचे सर्वेक्षण केले. अद्याप या दोन्ही सर्वेक्षण अहवालांवर कोणतीही कृती करण्यात आलेली नाही. आयटी पार्कमध्ये पाणी साचू नये, यासाठी तात्पुरत्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या. परंतु, त्या कामांनाही वेग आलेला नाही. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत आयटी पार्क पूरमुक्त होणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्यातच अनेक ठिकाणी अर्धवट कामे सुरू असल्याने रस्ते अरूंद झाले आहेत. त्यामुळे तिथे वाहतूक कोंडी नित्याची बाब बनली आहे. दररोज सायंकाळी वाहतूक कोंडीत तासनतास अडकून आयटी कर्मचारी त्रस्त आहेत. किमान ही कामे पूर्ण करून वाहतूक कोंडीतून तरी सध्या दिलासा द्यावा, अशी मागणी आयटी कर्मचारी करीत आहेत.
शासकीय यंत्रणा नापास
अवकाळी पावसाने आपण येत्या पावसाळ्यासाठी किती तयार आहोत, याची रंगीत तालीम करून दिली. दुर्दैवाने या परीक्षेत आपली यंत्रणा पुन्हा एकदा सपशेल नापास झाली आहे. पावसाळ्याच्या आधी मागील वर्षी ठरलेल्या कामांचा आढावा घेऊन राहिलेली कामे येत्या ६० दिवसांत पूर्ण करणे गरजेचे आहे, याकडे हिंजवडी एम्प्लॉईज अँड रेसिडंट्स ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेंद्र हुलसुरे यांनी लक्ष वेधले. पावसाळ्याआधी आयटी पार्कसह आजूबाजूच्या परिसरातील कामे पूर्ण न झाल्यास गेल्या वर्षीप्रमाणेच पूरस्थिती निर्माण होईल, अशी भीती आयटीयन्स व्यक्त करीत आहेत.
sanjay.jadhav@expressindia.com
