पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कनजीकच्या म्हाळुंगे टाउनशिप परिसरातील सुमारे आठ ते दहा हजार कुटुंबांना गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची दखल घेतली असून, पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. याचबरोबर नदीत थेट सांडपाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे पाऊल मंडळाकडून उचलण्यात येणार आहे.

म्हाळुंगे परिसरातील अनेक गृहनिर्माण संस्थांचा पाणीपुरवठा मुळा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र, नदीच्या पाण्याच्या शुद्धतेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. टाउनशिपच्या पाणी शुद्धीकरण केंद्रातून पुरवठा होणारे पाणी गढूळ आणि दुर्गंधीयुक्त आहे. काही प्रसंगी पाण्यात लाल रंगाचे किडेही आढळतात. नळाला येणाऱ्या पाण्याचा दर्जा वारंवार खालावत असल्याने पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी, तसेच दैनंदिन वापरासाठी हे पाणी सुरक्षित आहे की नाही, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. काही रहिवाशांनी त्वचेला खाज येणे, केस गळणे आणि वारंवार आजारी पडणे यांसारख्या गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहेत. सरकारी विभागामार्फत पाण्याच्या प्रयोगशाळेतील चाचण्यांद्वारे पडताळणी होणे आवश्यक आहे, असे रहिवासी संघाने म्हटले आहे.

म्हाळुंगे टाउनशिप आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर नवीन बांधकामे व गृहनिर्माण प्रकल्प विकसित होत आहेत. या विकासकामांशी संबंधित कामगार वसाहती आणि इतर ठिकाणांहून निर्माण होणाऱ्या सांडपाण्याची, तसेच घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात आहे का, याची सखोल तपासणी होणे आवश्यक आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे महापालिका आणि संबंधित नियोजन प्राधिकरणाने समन्वयाने कारवाई करून पाण्याचे तपासणी अहवाल आणि करण्यात आलेल्या कारवाईचा तपशील सार्वजनिक करावा. या महिन्याच्या अखेरपर्यंत मागण्यांवर प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली नाही, तर पुढील महिन्यात म्हाळुंगे परिसरातील नागरिक लोकशाही मार्गाने आंदोलन करतील, असे रहिवासी संघाने स्पष्ट केले आहे.

रहिवाशांच्या मागण्या

  • पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासावी.
  • मुळा नदीची सरकारी यंत्रणांनी संयुक्त पाहणी करावी.
  • नदी प्रदूषणाच्या स्रोतांवर कारवाई करावी.
  • पाणीपुरवठा आणि शुद्धीकरण यंत्रणेबाबत पारदर्शकता ठेवावी.
  • आतापर्यंतच्या कारवाईचा तपशील जाहीर करावा.
  • पाण्याच्या गुणवत्तेवर नियमित देखरेखीसाठी यंत्रणा नेमावी.
  • रस्त्यांची कामे आणि रेडी मिक्स काँक्रीट प्रकल्पांमुळे होणारे प्रदूषण रोखावे.

मंडळाकडून कारवाईचे पाऊल

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मुळा नदीपात्रातून म्हाळुंगे टाऊनशिपला पाणी पुरवठा होत असलेल्या ठिकाणची पाहणी करण्यात आली. याचबरोबर सांडपाणी नदीत मिसळत असलेल्या ठिकाणांचीही पाहणी करण्यात आली. नदीतून पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. नदीत थेट सांडपाणी सोडणाऱ्यांवर कारवाईचे पाऊल उचलण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली.