हिंजवडीसह सात गावांचे विलीनीकरण पिंपरी पालिका निवडणुकीनंतरच ?

हिंजवडी व लगतच्या सात गावांचा पिंपरी महापालिकेत समावेश करून आगामी निवडणुकीसाठी त्या गावांसह प्रभागरचना केली जाईल, अशी शक्यता आता मावळली आहे.

पिंपरी : हिंजवडी व लगतच्या सात गावांचा पिंपरी महापालिकेत समावेश करून आगामी निवडणुकीसाठी त्या गावांसह प्रभागरचना केली जाईल, अशी शक्यता आता मावळली आहे. त्यामुळे गावांच्या समावेशाचा बराच काळ रखडलेला विषय आता पिंपरी पालिकेच्या निवडणुकीनंतरच मार्गी लागेल, असे चित्र तूर्त दिसून येत आहे.

हिंजवडी, माण, मारूंजी, जांबे, गहुंजे, नेरे आणि सांगवडे ही सात गावे पिंपरी पालिकेत समाविष्ट करण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव कित्येक महिन्यांपासून राज्य शासनाकडे अंतिम निर्णयासाठी विचाराधीन आहे. यापूर्वी १९८२ मध्ये पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, रहाटणी, सांगवी, थेरगाव, वाकड ही  गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. त्यानंतरच्या म्हणजेच १९८६ मध्ये झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत या गावांनाही सहभागी करून घेण्यात आले.

सप्टेंबर १९९७ मध्ये तळवडे, चिखली, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली, वडमुखवाडी, चोविसावाडी, दिघी, दापोडी, बोपखेल, पुनावळे, किवळे, मामुर्डी, रावेत या गावांचे महापालिकेत विलीनीकरण करण्यात आले. मात्र, त्या वर्षांत होणाऱ्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यातच उरकल्या होत्या. त्यामुळे या गावांमध्ये पाच वर्षांनंतर म्हणजे २००२ मध्ये निवडणुका झाल्या. वाकडलगतच्या ताथवडे गावचा समावेश २००९ मध्ये पालिकेत झाला. त्या ठिकाणी २०१२ मध्ये निवडणुका घेण्यात आल्या.

पिंपरी-चिंचवडच्या हद्दीलगतची चाकण, देहू, आळंदीसह आणखी २० गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा विषय अनेक वर्षांपासून चर्चेत होता. नंतर गावांची संख्या १४ पर्यंत खाली आली. बऱ्याच नाटय़मय घडामोडीनंतर अखेर सात गावांचा समावेश करण्याचा निर्णय झाला. त्यावर अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही. हा विषय राज्य शासनाकडे प्रलंबित आहे.

हिंजवडीसह या सात गावांच्या पटय़ात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव मानला जातो. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार या गावांच्या विलीनीकरणाचा विषय निवडणुकीपूर्वी मार्गी लावतील, असा अंदाज राजकीय वर्तुळात होता. आगामी २०२२ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. पालिकेचे ११ नगरसेवक वाढून नगरसेवकांची एकूण संख्या १३९ तर प्रभागांची संख्या ४६ राहणार असल्याचेही आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हिंजवडीसह नव्या सात गावांचा पालिकेत समावेश आणि तेथे निवडणुका होण्याची शक्यता तूर्त बारगळली असल्याचे सांगण्यात येते. प्रशासकीय पातळीवर मात्र याविषयी कोणतेही ठोस विधान करण्याचे अधिकाऱ्यांकडून टाळण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Hinjewadi pimpri municipal elections ysh

Next Story
राज्याला वीज टंचाई भासणार नाही- पवार
ताज्या बातम्या