पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील पायाभूत सुविधांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता पावसामुळे आयटी पार्कमधील रस्त्यांना नद्यांचे रूप आल्याचे चित्र वारंवार दिसत आहे. यामुळे हिंजवडी आयटी पार्क नव्हे, तर वॉटर पार्क अशी स्थिती निर्माण झाली आहे. आयटीयन्सनी या परिस्थितीसाठी उपरोधिकपणे सरकारी यंत्रणांचे आभार मानले आहेत. आयटी पार्कमध्ये शनिवारी (ता. ७) सकाळी पाऊस झाला होता. त्यानंतर तेथील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले.

या पाण्यातून वाट काढणाऱ्या वाहनांच्या चित्रफिती समाज माध्यमांवर टाकण्यात आल्या आहेत. ‘फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज’ने (एफआयटीई) या मुद्द्यावरून सरकारी यंत्रणांना जाब विचारला आहे. याबाबत ‘एफआयटीई’चे अध्यक्ष पवनजित माने म्हणाले, ‘पावसाचे पाणी तुंबल्यामुळे ‘आयटी पार्क’चे ‘वॉटर पार्क’ झाले. पाणी तुंबलेल्या ठिकाणी आम्ही जाऊन पाहणी केली. त्यावेळी सांडपाणी वाहिन्या पूर्णपणे चिखल, गवत, झाडे, बांधकामाचे साहित्य, मेट्रोच्या बांधकामाचे साहित्य यामुळे तुंबलेल्या आढळून आल्या. आयटी पार्कमधील पावसाचे पाणी वाहून नेणारी यंत्रणा पूर्णपणे बदलण्याची आवश्यकता आहे. आयटी पार्कमध्ये बांधकामे वाढली असून, नाल्यांवर अतिक्रमण झाले आहे. पावसाचे पाणी तुंबू नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करायला हव्यात.’

याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी दीर्घकालीन उपाययोजनांची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, हिंजवडीमधील टप्पा २ परिसरातील रायन इंटरनॅशनल स्कूलजवळ आणि इतर भागांत जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था आहे, की नाही, अशी शंका येते. येथील नालेसफाईसारखी कामे वेळेत होण्याची गरज असतानाही ती झालेली नाहीत. एमआयडीसीने यात तातडीने लक्ष घालून भविष्यात पाणी साचून नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार, उद्योगमंत्री आणि स्थानिक यंत्रणांच्या नाकर्तेपणामुळे हिंजवडी आयटी पार्कचे रूपांतर वॉटर पार्कमध्ये झाले आहे. त्यांनी आयटी पार्क आणि येथील कर्मचाऱ्यांसाठी काहीही काम केलेले नाही.पवनजित माने, अध्यक्ष, फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयटी पार्कमधील समस्या जुन्या आहेत. यात काही नवीन नाही. गेल्या दशकभरात सरकारी यंत्रणांकडून काहीही बदल झालेला नाही. सामान्य जनतेचा मात्र यंत्रणांवरील विश्वास उडाला आहे. ज्ञानेंद्र हुलसुरे, हिंजवडी एम्प्लॉईज अँड रेसिडंट्स ट्रस्ट (हार्ट)