पुणे : पुणेकरांसह आयटी कर्मचाऱ्यांचा रोजचा प्रवास सुकर करणारी हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सेवा सुरू होण्याचा मुहूर्त आणखी लांबणीवर पडला आहे. या संपूर्ण मार्गावर मेट्रो सेवा या महिन्याच्या अखेरीस सुरू करण्याचे नियोजन होते. परंतु, आता पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत ही सेवा सुरू होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे हा मार्ग आता दिवाळीच्या तोंडावर सुरु होण्याची शक्यता आहे.
हिंजवडी आयटी पार्कला पुण्याच्या मध्यवर्ती भागाशी जोडणाऱ्या पुणेरी मेट्रोची सेवा सुरू होण्याची प्रतीक्षा पुणेकरांसह आयटी कर्मचाऱ्यांना आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीएमआरएस) माण स्थानक ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय (बालेवाडी) स्थानक या १२ स्थानकांदरम्यानच्या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यास २३ जुलैला मंजुरी दिली. त्यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सुरुवातीला १२ स्थानकांदरम्यान सेवा सुरू करण्याचे नियोजन केले होते. नंतर आणखी पाच स्थानकांचे काम पूर्ण झाले असून, त्यांची तपासणी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून पूर्ण झाली आहे. त्यांच्याकडून लवकरच या पाच स्थानकांवरील सेवेला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण मेट्रो मार्गावर सेवा सुरू करण्यास हिरवा कंदील मिळेल.
मेट्रो सेवेचे उद्घाटन करण्याविषयी ‘पीएमआरडीए’ने राज्य सरकारला पत्र लिहिले होते. राज्य सरकारकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटनाचे नियोजन करण्यात आले. या महिन्याच्या अखेरीस उद्घाटन होऊन मेट्रो सेवा सुरू करण्याची तयारी ‘पीएमआरडीए’ने केली होती. पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा मंगळवारी झाली. त्यामुळे आचारसंहिता लागू झाली असून, ती २७ ऑक्टोबरपर्यंत असेल. या काळात मेट्रोच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सरकारला करता येणार नाही. त्यामुळे मेट्रो सेवा सुरू होण्यासाठी ऑक्टोबर अखेरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पुणेरी मेट्रो
माण ते जिल्हा न्यायालय
एकूण लांबी – २३.३ किलोमीटर
एकूण स्थानके – २३
सेवा सुरू होणारी स्थानके – १७
सेवा सुरू – ऑक्टोबर अखेरीस
प्रवासाचा वेळ ४५ मिनिटावर
सुरुवातीला मेट्रो सेवा ही माण ते बालेवाडी या १२ स्थानकांदरम्यान सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र आता सुरुवातीच्या माण स्थानकापासून अखेरच्या जिल्हा न्यायालय स्थानकांपर्यंत मेट्रो सेवा सुरू होणार आहे. यामुळे पुण्यातून हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमध्ये दररोज प्रवास करणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांचा प्रवास सुकर होणार आहें. सध्या या प्रवासासाठी दीड ते दोन तासांचा वेळ लागतो. मेट्रोमुळे हा वेळ केवळ ४५ मिनिटांवर येणार आहे.
लवकरात लवकर सेवा सुरू करण्याचा प्रयत्न
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सेवेचे उद्घाटन आचारसंहितेच्या काळात करण्याची शक्यता तपासून पाहत आहोत. केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी आधी १२ स्थानकांदरम्यान मेट्रो सेवा सुरू करण्यास मंजुरी दिली होती. त्यानंतर आणखी पाच स्थानकांवर सेवा सुरू करण्यास मंजुरी मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकरात लवकर ही सेवा सुरू करण्याचे आमचे प्रयत्न आहेत, अशी माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
