पिंपरी : बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करून पसार झालेल्या हिंजवडी येथील एका कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्याला (सीईओ) हिंजवडी पोलिसांनी अखेर अटक केले. त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
हर्षल भानुदास ठाकरे याला पोलिसांनी अटक केली आहे. सौरभ राजन नायर (वय २५, रा. देहूरोड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून सीईओ ठाकरे याच्यासह तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत २६ जणांच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. ११ लाख २५ हजार रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाली आहे. सातशेहून अधिक संगणक अभियंता, फ्रेशर्स, आणि शिकाऊ बेरोजगारांना ठाकरे याने नोकरीवर घेत कंपनी सुरू केली होती. कंपनीने यावर्षी एप्रिल महिन्यात कोणतीही पूर्वसूचना न देता कामकाज बंद केले. कर्मचार्यांना लॅपटॉप देण्याच्या नावाखाली प्रत्येकी १५ हजार रुपये अनामत रक्कम घेण्यात आली होती.
अनेक कर्मचार्यांचे वेतनही थकविण्यात आले होते. कंपनी अचानक बंद झाल्यानंतर आणि व्यवस्थापनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने कर्मचार्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. तसेच, कामगार न्यायालयातही धाव घेतली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी ठाकरे याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने सहकार्य न केल्याने सोमवारी फसवणूक आणि विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने नाशिकमधील आडगाव येथून ठाकरे याला ताब्यात घेतले. इतर आरोपींचा शोध सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली.
कंपनीच्या वरिष्ठाकडून महिलेचा विनयभंग; आरोपी अटकेत
औंध परिसरातील एका इन्शुरन्स कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मोहम्मद उर्फ जाफर सय्यद असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पिडीत महिला औंध येथील एका इन्शुरन्स कंपनीत कार्यरत होती. तिची हिंजवडी येथील एका बँकेत नियुक्ती केली होती. कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत असलेला मोहम्मद या महिलेला सातत्याने फोन करत होता. कामाव्यतिरिक्त संवाद साधत होता. जेवणासाठी घेऊन जात विनयभंग केला. महिलेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केल्याचे हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी सांगितले.
