पुणे विधानभवनात एका रात्रीत हिरकणी कक्ष स्थापना झाल्यानंतर महापालिकेतील गायब झालेला हिरकणी कक्ष कधी कार्यान्वित होणार, अशी विचारणा शहरातील स्वयंसेवी संस्थांनी केली आहे. महापालिकेतील हा कक्ष सर्व सुविधांनी तातडीने सुरू करावा, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे.
हेही वाचा >>>पुणे: वैमनस्यातून तरुणावर टोळक्याकडून हल्ला; मुंढव्यातील घटना
महापालिका मुख्य इमारतीमधील महिला कर्मचारी तसेच महापालिकेत कामासाठी येणाऱ्या महिलांसाठी सन २०१६ मध्ये हिरकणी कक्ष उभारण्यात आला. याठिकाणी स्तनदा मातांना बालकांना दूध पाजण्याची व्यवस्था तसेच महिलांना विश्रांती घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी तिथे दिव्यांग कक्ष सुरू करण्यात आला आणि हिरकणी कक्ष इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील काका वडके सभागृहाशेजारील खोलीत कागदोपत्री हलवण्यात आला आहे. या नव्या जागेची पाहणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यावेळी तेथे हिरकणी कक्षाचा फलक नसल्याचा आणि ही व्यवस्थाच अस्तित्वात नसल्याचे त्यांना आढळून आले होते. कक्षाच्या जागेत मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या फाईल्स ठेवण्यात आल्या असून त्या विभागाचे दोन कर्मचारी तेथे काम करत असल्याचे पाहणी दौऱ्यात निदर्शनास आले. त्याबाबतची तक्रार महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांच्याकडेही वेलणकर यांनी केली होती.
हेही वाचा >>>पुणे: रुग्णांच्या आजाराची माहिती आता एका क्लिकवर !
विधानभवनात हिरकणी कक्ष तातडीने सुरू करण्यात आला आहे. त्याची दखल घेत महापालिकेनेही सर्व सुविधांनीयुक्त हिरकणी कक्ष कार्यान्वित करावा, अशी मागणी वेलणकर यांनी आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.