निवडणुकांच्या प्रचारासाठी राजकीय वातावरण तापलेले असतानाच हवामानातील उष्मासुद्धा वाढला असून, आता राज्याच्या अनेक भागात कमाल तापमान ४० अंशांवर पोहोचले आहे. पुढील दोन दिवसांत आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असल्याने राज्यात उकाडा कायम राहील, असा अंदाज वेधशाळेतर्फे व्यक्त करण्यात आला आहे. पुण्यात पाऱ्याने सोमवारी या हंगामातील उच्चांकी ३८.८ अंशांचा टप्पा गाठला, तर लोहगाव येथे तो ३९.७ अंशांवर गेला.
राज्यात आठवडय़ापासून उकाडा जाणवू लागला आहे. त्यामुळे सर्वत्र त्याचा त्रास जाणवू लागला आहे. विशेषत: कोकणात काही ठिकाणी अधिक उकाडा जाणवत आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातही कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत जास्त नोंदवले गेले आहे. पुढच्या काही दिवसांत आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून तापमानात झालेली वाढ अशीच कायम राहण्याची शक्यता आहे, असे पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले.
राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडला आहे. त्यात मालेगाव (४१ अंश), सोलापूर (४१.१), भीरा (४१.५), नांदेड (४०.५), बीड (४०.२), वर्धा (४०.९), अकोला (४०.१), ब्रह्मपुरी (४१.१), वर्धा (४०.९) या ठिकाणांचा समावेश आहे. याशिवाय राज्यात इतरत्र नोंदवले गेलेले कमाल तापमान पुढीलप्रमाणे (अंश सेल्सिअसमध्ये)- पुणे ३८.८, लोहगाव ३९.७, अहमदनगर ३९.८, जळगाव ३९.९, कोल्हापूर ३८.६, महाबळेश्वर ३२.१, नाशिक ३६.३, सांगली ३८.२, सातारा ३९.७, मुंबई ३०, सांताक्रुझ ३२, अलिबाग २९.७, डहाणू ३०.९, उस्मानाबाद ३८.३, औरंगाबाद ३८, परभणी ३९, अमरावती ३९.८, बुलडाणा ३७.२, गोंदिया ३८.२, नागपूर ३९.९ , वाशिम ३८.४, यवतमाळ ३९.