पुणे : पावसामुळे धानोरीत जाहिरातफलक कोसळल्याची घटना विश्रांतवाडीतील धानोरी भागात घडली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. शहर, परिसरात मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पाऊस पडला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे धानोरी-पोरवाल खाण रस्त्यावर असलेला जाहिरातफलक कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. लोखंडी सांगाडा रस्त्याच्या कडेला पडला होता. जवानांनी कटरचा वापर करून तो तोडला आणि तेथून हटवून वाहतूक सुरळीत केली. या घटनेच्या वेळी कोणी तेथे थांबले नव्हते. अन्यथा गंभीर दुर्घटना घडली असते, अशी माहिती अग्निशामक दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी दिली.
गेल्या वर्षी पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर भागात जाहिरातफलक कोसळला होता. त्या घटनेत एका बँडपथकाच्या गाडीचे नुकसान झाले होते, तर फलकाखाली थांबलेला घोडा गंभीर जखमी झाला होता. तसेच, काही वादकही जखमी झाले होते. पिंपरी-चिंचवडमधील रावेत परिसरात गेल्या वर्षी जाहिरातफलक कोसळून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. चार वर्षांपूर्वी मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकात जाहिरातफलक कोसळून चौघांचा मृत्यू झाला होता.