पुणे : समाजमाध्यमातून प्रसारित झालेली गृहसजावटीची जाहिरात प्रसारित करुन सायबर चोरट्यांनी एका तरुणाची आठ लाख दहा हजार रुपयांची ऑनलाइन पद्धतीने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका तरुणाने फिर्याद दिली आहे.
तक्रारदार तरुण मुंढवा भागातील केशवनगर भागात राहायला आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी तरुणाने गृहसजावटीबाबत एक संदेश समाज माध्यमात प्रसारित केला होता. त्यानंतर सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. स्वस्तात गृहसजावटीचे काम करुन देतो, अशी बतावणी करुन चाेरट्यांनी तरुणाला जाळ्यात ओढले. चोरट्यांनी तरुणाला बँक खात्यात पैसे जमा करणयास सांगितले. तरुणाने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी आठ लाख दहा हजार रुपये जमा केले. चोरट्यांनी गृह सजावटीचे काम करण्यास टाळाटाळ केली. तरुणाने चौकशी केली. तेव्हा सायबर चोरट्यांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. तरुणाने नुकतीच पोलिसंकडे तक्रार दिली असून, वरिष्ठ पोलीसन निरीक्षक स्मिता वासनिक तपास करत आहेत.
सायबर चोरट्यांकडून महिलेची फसवणूक
शेअर बाजारात गुुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची फसवणूक शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका महिलेची १७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४४ वर्षीय महिला कोंढवा भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी गेल्या वर्षी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी महिलेला दाखविले होते. महिलेने चोरट्यांच्या खात्यात सुरुवातीला काही रक्कम जमा केली. चोरट्यांनी महिलेला परतावा मिळाल्याचा संदेश पाठविला. प्रत्यक्षात महिलेला परतावा देण्यात आला नाही. परतावा मिळाल्याचा संदेश पाहिल्यानंतर महिलेने चोरट्यांच्या खात्यात वेळावेळी रक्कम जमा केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे तपास करत आहेत.

