राज्यात मशिदीवरील भोंग्यापासून सुरु झालेला वाद हनुमान चालिसा पर्यंत येऊन पोहोचला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्याचा इशारा दिल्यानंतर राज्यातील वातावरण तापले होते. त्यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्यावर हनुमान चालिसा म्हणण्याची घोषणा केली होती. यामुळे शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते. या प्रकरणी राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. याबाबत बोलताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाष्य केले आहे. महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग निवृत्ती गायकवाड यांचा सेवापूर्ती गौरव सोहळ्यात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते.  

“राज्यामध्ये गंभीर परिस्थिती काही नाही. राज्यामध्ये सगळी परिस्थिती आटोक्यात आहे. परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न काही लोक करतात पण त्याला कसं पुरुन उराचयं याचे मार्गदर्शन शरद पवारांमुळे आहे,” असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना दिलीप वळसे पाटील यांनी आर्यन खान प्रकरणाबाबतही भाष्य केले.“न्यायालयाचा निर्णय आला असून आर्यन खानवर जे आरोप केले गेले त्यामध्ये काही तथ्य आढळले नाही. केंद्रानेसुद्धा याची दखल घेतली असून संबधितांविरुद्ध कारवाईची सूचना दिली आहे. अशा पद्धतीने एखाद्या निष्पाप व्यक्तीला अडकवण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. मला असं वाटतं त्यांच्यावर कारवाई होईल आणि त्यांनी ज्या प्रकारे हे प्रकरण हाताळले आहे त्यानुसार त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे,” असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

दरम्यान, अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यनसह सहा जणांविरोधात पुरेसे पुरावे नसल्याचे स्पष्ट करीत केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) शुक्रवारी त्यांच्यावरील आरोप रद्द केले. गेल्या काही वर्षांत हिंदी चित्रसृष्टीतील तारांकितांपासून ते सहकलाकारांविरोधात ‘एनसीबी’ने केलेल्या अनेक कारवाया फोल ठरल्या, त्यात आर्यन खान निमित्ताने आणखी एकाची भर पडली आहे. त्यानंतर आताक्रूझ ड्रग प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे तत्कालीन मुंबई प्रमुख समीर वानखेडे यांच्याविरोधात चौकशी सुरू करण्याचा आदेश केंद्र सरकारने केंद्रीय अर्थ मंत्रालयाला दिला असल्याचे समजते. त्यामुळे ‘एनसीबी’तून यापूर्वीच उचलबांगडी झालेल्या वानखेडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.