पुणे : हडपसर भागातील एका सोसायटीतील सदनिकेतून ४८ तोळे सोन्या-चांदीचे दागिने असलेली तिजोरीच चोरून पसार झालेल्या चोराला गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली. घरफोडी करण्यापूर्वी चोराने दुचाकी चोरली. वाहन क्रमांकाची पाटी काढून पसार झालेल्या चोराचा पुण्यासह बार्शी, सोलापूर, धाराशिव, परांडा भागात शोध घेण्यात आला होता.
रोहित विलास अंधारे (वय २५, रा. भांडगाव, ता. परांडा, धाराशिव, सध्या. रा, खराडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. अंधारे हा एका खासगी रुग्णालयात एक्स-रे तंत्रज्ञ म्हणून नोकरी करत होता. त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. कर्जबाजारी झाल्याने त्याने घरफोडीचा गुन्हा केल्याचे तपासात उघडकीस आले.
हडपसर भागातील एका सोसायटीत असलेल्या सदनिकेचे कुलूप तोडून अंधारेने १८ मे रोजी ४८ तोळे सोन्याचे, तसेच चांदीचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या पथकाकडून याप्रकरणाचा समांतर तपास सुरू होता. तपासात वाहन क्रमांकाची पाटी नसलेली दुचाकी पोलिसांना आढळून आली होती. याच दुचाकीचा वापर करून आरोपीने घरफोडी करून पसार झाल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात आढळले होते. पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. १७० ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पोलिसांनी तपासले.
धाराशिव, भूम, सोलापूरसह विविध भागांत शोधमोहीम राबवली. गुन्हे शाखेच्या पथकाने सलग २३ दिवस तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही चित्रीकरण, तसेच अन्य माहितीच्या आधारे तपास करून आरोपीला मांजरी भागातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४८ तोळे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि दुचाकी जप्त केली.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, संदीपान पवार, सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे, सी. बी. बेरड, पोलीस कर्मचारी बाळू गायकवाड, प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, अजित शिंदे, अमोल सरतापे, विनायक येवले, मनोज खरपुडे, जहाँगीर पठाण, श्रीकांत दगडे यांनी ही कामगिरी केली.