बालकाच्या मृत्यूनंतर बिर्ला रुग्णालयात पालक व स्थानिक पुढाऱ्यांचा गोंधळ

चिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयात सोमवारी एका बालकाचा मृत्यू झाल्यानंतर १० लाखांचे बिल पूर्ण भरलेले नसल्यामुळे रुग्णाचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यास रुग्णालयाने नकार दिला.

चिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयात सोमवारी एका बालकाचा मृत्यू झाल्यानंतर १० लाखांचे बिल पूर्ण भरलेले नसल्यामुळे रुग्णाचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यास रुग्णालयाने नकार दिला. या कारणावरून रुग्णाच्या नातेवाइकांसह स्थानिक नगरसेवकांनी रुग्णालयात गोंधळ घातल्यानंतर मंगळवारी मृतदेह ताब्यात देत रुग्णालयाने उरलेले बिल माफ केले.
अडीच वर्षांच्या अंकित जगदीश पांडे या बालकाला २६ ऑगस्ट २०१३ ला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या बालकाला ‘क्रॅनिओ व्हर्टिब्रल अबनॉर्मिलिटी’ हा दुर्मिळ आजार होता. या आजारात मानेचा मणका आकुंचन पावून शरीर लुळे पडते. या रुग्णाचे एकूण बिल दहा लाख रुपये लावण्यात आले होते. यापैकी ७ लाख ३८ हजार रुपये रुग्णाच्या पालकांनी भरले होते. सोमवारी दुपारी रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर पालकांनी उरलेली रक्कम न भरल्यामुळे रुग्णालयाने मृतदेह ताब्यात देण्यास नकार दिला. यानंतर काही शिवसेना कार्यकर्ते व स्थानिक नगरसेवकांनी रुग्णालयाच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी रेखा दुबे यांना घेराव घातला.
याबाबत रुग्णालयाच्या अधिकारी दुबे म्हणाल्या, ‘‘रुग्णाच्या मृत्यूनंतर पालकांनी उरलेले बिल भरण्यास नकार दिला. रुग्णालयाच्या बालरोग विभागाने हा आजार क्वचित आढळणारा असून रुग्णाला वाचवणे अवघड असल्याची कल्पना पालकांना दिली होती. त्यानंतर रुग्णासाठी शस्त्रक्रियेचा सल्ला देतानाही पालकांना शस्त्रक्रियेमुळे रुग्णाच्या प्रकृतीत फारसा फरक पडणार नसल्याचे सांगितले होते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर सहा दिवसांनी रुग्णालयाने पालकांना उपचार थांबवून रुग्णाला घरी घेऊन जाण्यास सांगितले होते. परंतु पालकांनी रुग्णाचे उपचार न थांबवण्याचा निर्णय घेतला आणि तशा लेखी पत्रावर सही देखील केली.’’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Hospital refuse to handover dead body due to pending bill

ताज्या बातम्या