पुणे : भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार हाॅटेल व्यवस्थापक महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर शनिवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी ट्रक चालकाला हडपसर पोलिसांनी अटक केली.

वैशाली विजय गलांडे (वय ४९, रा. पुष्पराज हाऊसिंग सोसायटी, सिद्धी हाॅस्पिटलजवळ, बालाजीनगर, धनकवडी) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी ट्रक चालक विजय मेवाराम यादव (वय ४५, रा. कानपूर, उत्तर प्रदेश) याला अटक करण्यात आली. याबाबत वैशाली गलांडे यांचा मुलगा यशोधन (वय २४) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली या पुणे-सोलापूर रस्त्यावरील एका हाॅटेलमध्ये व्यवस्थापक आहेत. त्यांच्या कामाची वेळ दुपारी तीन ते रात्री बारा अशी आहे. शुक्रवारी (३१ ऑक्टोबर) त्या नेहमीप्रमाणे दुपारी कामावर गेल्या. रात्री बाराच्या सुमारास त्यांचे काम संपल्यानंतर त्या हाॅटेलमधून घरी निघाल्या. मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास त्या पुणे-सोलापूर रस्त्याने दुचाकीवरुन घरी निघाल्या होत्या. कुमार मेडोस सोसायटीसमोर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने दुचाकीस्वार वैशाली यांना धडक दिली. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. गलांडे यांच्या मागे मुलगा, पती असा परिवार आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे यांनी दिली. उपनिरीक्षक कवळे तपास करत आहेत.

दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना लोहगाव परिसरात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहन चालकाविरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आयुष चंद्रकांत पुजारे (वय २१, रा. स्वामी समर्थनगर, साठे वस्ती, लोहगाव) असे मृत्यमुुखी पडलेल्या महाविद्यालयीन तरुणाचे नाव आहे. याबाबत आयुषचे वडील चंद्रकांत यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष हा लोहगाव भागातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. २७ ऑक्टोबर रोजी तो महाविद्यालयातून घरी निघाला होता. त्यावेळी लोहगावमधील दादाची वस्ती परिसरात भरधाव वाहनाने दुचाकीस्वार आयुषला धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहन चालक पसार झाला. पसार झालेल्या वाहन चालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलिसंनी सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक शिरसाठ तपास करत आहेत.