पुणे : शहरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून वेगवेगळ्या भागात सदनिकांचे कुलुप तोडून चोरट्यांनी नऊ लाख रुपयांचा ऐवज लांबविला. कात्रज, हडपसर भागात घरफोडीच्या घटना घडल्या.

हडपसरमधील भेकराईनगर परिसरातील नामदेव रुकारी बाग हौसिंग सोसायटीतील सदनिकेचे कुलुप चोरट्यांनी तोडून कपाटातील सहा लाख १७ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले. याबाबत निलाद्री चौधरी (वय ४९) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चौधरी यांच्या सदनिकेचे कुलुप चोरट्यांनी तोडले. कपाटातील सहा लाख १७ हजारांचे दागिने लांबविल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक तृप्ती खळदे तपास करत आहेत.

कात्रज परिसरातील शुभारंभ काॅलनीतील एका घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी कपाटातील ३० हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा तीन लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक घावटे तपास करत आहेत.

मोबाइल विक्री दुकानात चोरी

हडपसरमधील सातववाडी परिसरातील एका मोबाइल विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी मोबाईल संच तसेच अन्य साहित्य असा एक लाख ६६ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत हेमलता अगरवाल (वय ४८, रा. हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अगरवाल यांचे सातववाडी परिसरात संदेश एजन्सीज मोबाइल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचा दरवाजा उचकटून मोबाईल संच आणि अन्य साहित्य लांबविले. पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे तपास करत आहेत.