पुणे : देशभरात गृहनिर्माण क्षेत्रातील बांधकाम खर्चात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या पाच वर्षांत बांधकाम खर्चात ३४ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. जमिनीचे भाव गगनाला भिडल्याने त्याचा परिणामही घरांच्या किमतीवर होत आहे. यामुळे परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीत घट होत असून, विकासकांच्या नफ्यालाही कात्री लागत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, पश्चिम आशियातील युद्धामुळे आगामी काळात घरांच्या किमतीतील वाढ सुरूच राहणार असल्याचे समोर आले आहे.
ॲनारॉक ग्रुपने देशातील सात महानगरांतील गृहनिर्माण क्षेत्रातील बांधकाम खर्चाचा अहवाल जाहीर केला आहे. यात मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकाता या महानगरांचा समावेश आहे. या अहवालानुसार देशात २०२१ ते २०२५ या पाच वर्षांत घरांच्या बांधकाम खर्चात ३४ टक्के वाढ झाली आहे. घरांचा सरासरी बांधकाम खर्च २०२१ मध्ये प्रतिचौरस फूट २ हजार ६८१ रुपये होता. तो २०२५ मध्ये प्रतिचौरस फूट ३ हजार ६०४ रुपयांवर पोहोचला. बांधकाम खर्चात झालेली ६६ टक्के वाढ ही प्रत्यक्ष बांधकामाच्या खर्चाशी संबंधित असून, उर्वरित ३४ टक्के जमिनीची किंमत, विकासकांचा नफा, बाजारपेठेतील मागणी व पुरवठ्याचे बदलणारे गणित या घटकांवर अवलूंबन आहे.
गेल्या पाच वर्षांत घरांच्या सरासरी किमतीतील वार्षिक वाढ ६.९ टक्के नोंदविण्यात आली आहे. देशातील सात महानगरांमध्ये जमिनीच्या किमतीत २०२१ ते २०२६ ची पहिली सहामाही या कालावधीत ५० ते १२० टक्क्यांपर्यंत वाढ नोंदविण्यात आली आहे. जमिनीच्या वाढत्या किमतीमुळे गृहनिर्माण प्रकल्पांच्या व्यवहार्यतेसह घरांच्या किमतीवर परिणाम होत आहे. गेल्या पाच वर्षांत घरांच्या सरासरी किमती ५९ टक्क्यांनी वाढून प्रतिचौरस फूट ५ हजार ८२६ रुपयांवरून ९ हजार २६० रुपयांवर गेल्या आहेत. घरांच्या किमतीतील ही वार्षिक वाढ १२ टक्के आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
पाच वर्षांतील बदलते चित्र (२०२१-२०२५)
बांधकाम खर्चातील वाढ – ३४ टक्के
जमिनीच्या किमतीतील वाढ – ५० ते १२० टक्के
घरांच्या किमतीतील वाढ – ५९ टक्के
युद्धामुळे आणखी वाढ
देशातील सात महानगरांमध्ये गेल्या पाच वर्षांत जमिनीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. पायाभूत सुविधांचा विकास आणि मागणी व पुरवठ्याचे गणित यानुसार जमिनीच्या किमती वाढत आहेत. या वर्षात पश्चिम आशियातील युद्धामुळे बांधकाम साहित्याच्या किमती आणखी वाढल्या असून, बांधकाम खर्चात आणखी ८ ते १० टक्के वाढ झाली आहे. विकासकांडून या वाढीचा भार ग्राहकांवर टाकला जात असून, त्याचा परिणाम घरांच्या किमतीवर होत आहे, असे ॲनारॉक ग्रुपचे उपाध्यक्ष संतोष कुमार यांनी सांगितले.
