woman police hawildar caught prisoner : खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना येरवड्यातील खुल्या कारागृहातून पसार झालेल्या कैद्याला मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस हवालदाराने पकडले. राजू पंढरीनाथ दुसाने (वय ४३, रा. महालगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या कैद्याचे नाव आहे.
दुसाने याने २०१५ मध्ये चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर कोयत्याने वार करून खून केला होता. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला होता. २०२१ मध्ये त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली हाेती. कारागृहात त्याची वर्तणूक चांगली असल्याने त्याची जानेवारी महिन्यात येरवड्यातील खुल्या कारागृहात रवानगी करण्यात आली. कारागृहाकडून सुरू करण्यात आलेल्या उपहारगृहात तो काम करत होता. सोमवारी (१९ ऑगस्ट) सायंकाळी कारगृह रक्षकांनी हजेरी घेतली. तेव्हा खुल्या कारागृहातून दुसाने पसार झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मार्केट यार्ड पोलीस ठाण्यातील पथक गस्त घालत होते. पसार झालेल्या दुसाने याचे छायाचित्र सर्व पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आले होते. पोलीस हवालदार यशोदा वेदपाठक मार्केट यार्डातील वखार महामंडळाजवळ गस्त घालत होत्या. त्यावेळी त्यांनी तेथील बसथांब्याजवळ थांबलेल्या दुसानेला पाहिले. पोलिसांच्या समुहावर प्रसारित करण्यात आलेले दुसानेचे छायाचित्र त्यांनी पाहिले होते. त्याच्या संशयास्पद हालचाली त्यांनी टिपल्या. वेदपाठक यांनी त्याची चौकशी सुरू केली. तेव्हा दुसानेने उडवाउडवीची उत्तरे दिली. वेदपाठक यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. त्याला मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. चौकशीत दुसाने कारागृहातून पसार झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला येरवडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस उपायुक्त आर. राजा, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया देवरे, हवालदार यशोदा वेदपाठक आणि पथकाने ही कामगिरी केली.