अलीकडच्या काळात पाळीव प्राणी अनेकांच्या कुटुंबाचे सदस्य झाले आहेत. त्यांच्यासाठी खाद्यनिर्मिती करणारे उद्योग क्षेत्र एका बाजूला बहरत असून, वैद्यकीय क्षेत्रातही मोठी उलाढाल होत आहे. श्वानांची काळजी घेण्यासाठी, त्यांना दोन वेळा फिरायला नेण्यासाठी मनुष्यबळाचीही आवश्यकता भासत आहे. दुसऱ्या बाजूला भटके श्वान आणि त्यांना खायला घालणारे प्राणिप्रेमी या विषयावर वाद आहेत. या पार्श्वभूमीवर, पेट (पेट केअर एज्युकेशन अँड ट्रेनिंग इकोसिस्टीम) या संस्थेचे संचालक पार्थ जोशी यांच्याशी श्रीराम ओक यांनी साधलेला संवाद.
पाळीव प्राणी आणि प्राणिप्रेमी अशी वेगळी परिसंस्था निर्माण झाली आहे का?
- हो निश्चितच. पुण्यासारख्या शहरांमध्ये पाळीव प्राणी केवळ छंदापुरते मर्यादित राहिलेले नसून, ते शहरी कुटुंबजीवनाचा महत्त्वाचा भाग बनले आहेत. खुली मैदाने, उद्याने, कॅफे तसेच पाळीव प्राण्यांना अनुकूल रचना असलेली घरे यांसारख्या सुविधांची मागणीही वाढत आहे. पुण्यातील पाळीव प्राण्यांचे पालक अर्थात ‘पेट पेरेंट्स’ नियमितपणे छोटे मेळावे, संमेलनांचे आयोजन करताना दिसतात. महापालिका स्तरावरही पाळीव प्राण्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे व नियमांवर चर्चा सुरू आहे. हा विषय स्थानिक पातळीवर व्यापक आणि गुंतागुंतीचाही झाला आहे. त्यातच पेट केअर उत्पादने व सेवांची वाढती मागणी आणि त्यानिमित्ताने यात वाढत असलेली उद्योजकता हा नवा आयाम निर्माण झाला आहे.
प्राणी पाळणाऱ्यांना प्रशिक्षणाची आवश्यकता असते का?
- प्रशिक्षण गरज बनली आहे. शहरांमध्ये अनेक कुटुंबांमध्ये श्वान, मांजरी ही कुटुंबातील सदस्य मानली जातात. मात्र, केवळ प्राणिप्रेम असून चालत नाही; योग्य काळजी, वर्तन समजून घेणे, आहार, स्वच्छता आणि प्राथमिक आरोग्य याबाबत शास्त्रीय माहिती असणे हेही अत्यंत महत्त्वाचे आहे. बऱ्याच वेळा चुकीची हाताळणी, अपुऱ्या माहितीमुळे, तसेच अनाहूत सल्ल्यांमुळे पाळीव प्राण्यांच्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर परिणाम होतो. त्यामुळेच प्रशिक्षण आणि मार्गदर्शन आवश्यक ठरते. पुण्यात ‘पेट केअर इंडस्ट्री’ वेगाने वाढत आहे. या क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. त्यांना संस्थांमार्फत कौशल्याधारित प्रशिक्षण दिल्यास, रोजगाराच्या संधीही उपलब्ध होऊ शकतात. त्यातून नवीन आणि विद्यमान ‘पेट पेरेंट्स’ना प्राण्यांचे वर्तन, योग्य देखभाल, जबाबदार पालकत्व आणि प्राथमिक आरोग्य यांचे व्यावहारिक ज्ञान मिळू शकते.
प्राणिप्रेमींच्या प्रशिक्षणात त्रुटी काय जाणवतात?
- आज अनेक प्राणिप्रेमी या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहतात. आपल्याकडे प्राण्यांसाठीचे वैद्यकीय आणि नर्सिंगसाठीचे अनेक अभ्यासक्रम आहेत. पण, या सगळ्यात आपण आपल्या पाळीव प्राण्याची काळजी कशी घ्यायची, त्यांना कोणते प्रशिक्षण द्यायचे आणि ते कसे द्यायचे, त्यांचे ग्रूमिंग म्हणजे काय, त्यांच्या जाती-प्रजाती कशा ओळखायच्या, याचे पद्धतशीर व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था कमी आहेत.
भटक्या श्वानांच्या प्रश्नाकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता?
- आपल्या देशात रस्त्यावरील श्वानांना अन्न देणे हा केवळ नैतिक प्रश्न नसून, तो मानवी हक्क आणि प्राणी कल्याणचा विषय आहे. भुकेले प्राणी जास्त असुरक्षित आणि घाबरलेले असतात. जेव्हा त्यांना अन्न मिळते, तेव्हा ते स्वाभाविकपणे शांत होतात आणि माणसांबद्दल त्यांना विश्वास वाटायला लागतो. म्हणूनच भटक्या प्राण्यांना अन्न देणे, ही खरी समस्या नसून, त्यांच्याकडे होणारे दुर्लक्ष ही खरी समस्या आहे. भटक्या श्वानांना अन्न देताना एक शिस्तबद्ध आणि जबाबदार पद्धत असणे अत्यंत आवश्यक आहे. रस्त्यावरील ठरावीक ठिकाणी स्वच्छतेची पूर्णपणे काळजी घेऊन स्थानिक प्रशासनाच्या मदतीनेच भटक्या श्वानांना अन्न-पाणी देणे आवश्यक आहे. त्याचबरोबरच प्रशासनाने योग्य वेळी लसीकरण व नसबंदीसारखे उपक्रम राबवले, तर भटक्या श्वानांबद्दलच्या असुरक्षित भावनेला आळा बसून माणूस आणि भटके श्वान यांच्यात एक संवेदनशील नाते निर्माण होण्यास मदत होईल.
shriram.oak@expressindia.com

