शिक्षण विभागाच्या निर्णयांनी शिक्षकोंचे मनोरंजन

‘हात साबणानेच धुवावेत. हाताचा कमीत कमी वापर करून पदार्थ खावेत. रोज आंघोळ करावी अशा बाबींचे शिक्षण मुलांना देण्यात यावे,’ असे तपशील असलेला शासन निर्णय आहे.
तोही कोणत्याही अविकसित देशातील नाही, तर प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातील. विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या सवयी कशा लावाव्यात याच्या सूचना देणारा तब्बल १५ पानांचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने काढला आहे. असा निर्णय प्रसिद्ध करावा लागतो आहे, हे दुर्दैव असल्याची कबुलीही प्रस्तावनेत देऊन टाकली आहे.
राज्यात १ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान ‘स्वच्छ विद्यालय-स्वच्छ महाराष्ट्र’ मोहीम राबवण्यात येत आहे. ‘या जगात एकही डास, माशी अस्तित्वात नसलेले देश आहेत, हाताचा संबंध येऊ न देता काटे-चमचे वापरून जेवणारे देश आहेत, कुत्र्यांनाही स्वच्छतेचे धडे देणारे देश आहेत, मग आपल्यालाच हे का जमत नाही,’ असा काहीसा गहन प्रश्न शिक्षण विभागाला पडला आणि विभागाने त्यासाठी निर्णयही प्रसिद्ध करून टाकला. शासनाने प्रसिद्ध केलेल्या या निर्णयाचा मसुदा सध्या शिक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
विद्यार्थ्यांना स्वच्छ हात धुण्याचे शिक्षण द्यावे, ते कसे द्यावे, विद्यार्थी रोज आंघोळ करतील याची खातरजमा करावी अशा सूचना या निर्णयातून शिक्षकांना देण्यात आल्या आहेत.
त्यासाठी जिल्ह्य़ातील सर्व शाळांसाठी मिळून तरतूद मात्र ५ लाख रुपयांचीच करण्यात आलेली आहे. मुळात स्वच्छतेच्या या सवयी शिक्षकांनी अंगी बाणवाव्यात असा टोलाही शिक्षकांना लगावला आहे. ‘देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झाल्यावरही अशी मोहीम हाती घ्यावी लागत आहे यावरून देशाचे शिक्षण हे मूलभूत उद्देश प्राप्तीपासून असफल झाले आहे, असे दु:खाने म्हणावे लागते,’ अशी कबुलीही या निर्णयाच्या मसुद्यात देण्यात आली आहे.