पुणे : राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाकडून पुणे जिल्ह्यात ९ मार्चपासून ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागातील ४१ हजार ३८७, पुणे महापालिकेतील ३३ हजार आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील २४ हजार ५२० अशा एकूण ९८ हजार ९०७ मुलींना या मोहिमेअंतर्गत लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

जगभरातील लाखो महिला गर्भाशय मुखाच्या कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराशी लढत आहेत. या कर्करोगाच्या ९९.७ टक्के रुग्णांमध्ये एचपीव्ही या विषाणूचा संसर्ग हे मुख्य कारण दिसून येते. या विषाणूचा दीर्घकाळ टिकणारा संसर्ग पुढे कर्करोगास कारणीभूत ठरू शकतो. या पार्श्वभूमीवर २०३० पर्यंत गर्भाशय मुखाचा कर्करोग निर्मूलनाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यात दर एक लाख महिलांमागे रुग्णांचे प्रमाण चारपेक्षा कमी राखणे हे अंतिम उद्दिष्ट आहे. त्यासाठी २०३० पर्यंत १५ वर्षांखालील मुलींमध्ये एचपीव्ही लसीकरणाचे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत नेणे, ३५ वर्षांपर्यंतच्या महिलांपैकी किमान ७० टक्के महिलांची तपासणी करणे आणि ४५ व्या वर्षी पुन्हा तपासणी करणे तसेच तपासणीमध्ये आजार आढळलेल्या ९० टक्के महिलांवर वेळेवर उपचार करणे, ही उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत.

लस कोणती?

या लसीकरण मोहिमेत क्वाड्रिव्हॅलेंट एचपीव्ही लस (गार्डासिल) ही द्रव स्वरूपातील लस दिली जात आहे. या लसीचा १४ वर्षे वयोगटातील मुलींना डाव्या हाताच्या वरच्या भागातील स्नायूमध्ये ०.५ मिलीचा एकच डोस दिला जातो. केंद्र सरकारने दोन किंवा तीन डोसच्या वेळापत्रकाऐवजी एकच डोस वेळापत्रक स्वीकारले आहे. संशोधनानुसार हा एक डोस दोन डोसइतकाच प्रभावी संरक्षण देतो आणि दीर्घकाळ टिकणारी प्रतिकारशक्ती निर्माण करतो. जिल्ह्यात १४ वर्षे वयोगटातील मुलींचे (चौदावा वाढदिवस साजरा केला आहे परंतु पंधरावा वाढदिवस अद्याप झालेला नाही) ९ मार्चपासून लसीकरण करण्यात येत आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.

Award Banner

प्रबोधनावर भर

एचपीव्ही लसीकरणासाठी शाळांमध्ये विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांचे प्रबोधन करण्यात येत असून नागरिकांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देऊन लसीकरण यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे. यात शालेय शिक्षण विभागाचे सहकार्य लाभत आहे. अधिक माहितीसाठी १०४ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली.