पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून पुण्यात ९ मार्चपासून ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यात १४ वर्षे वयोगटातील मुलींना ही लस देण्यात येत आहे. मात्र, या मोहिमेला अल्प प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत केवळ ३०३ मुलींचे लसीकरण होऊ शकले आहे. या लसीकरणाबाबत असणाऱ्या गैरसमजांमुळे लसीकरण कमी होत असल्याने आरोग्य विभागाने आता मोठे पाऊल उचलले आहे. घरोघरी जाऊन या लसीचे महत्व पटवून देण्यात येणार आहे.

आरोग्य विभागाने पुणे महापालिकेच्या हद्दीत ३३ हजार मुलींना ही लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यात १४ वर्षे पूर्ण झालेल्या परंतु १५ वर्षे पूर्ण नसलेल्या मुलींना लस देण्यात येत आहे. ही लसीकरण मोहीम सुरू होण्याआधी स्वयंसेवी संस्थांनी महापालिकेच्या सहकार्याने शाळांमध्ये जाऊन मुलींना एचपीव्ही लस दिली होती. त्यात २ हजार २६५ मुलींना लस देण्यात आली होती. लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून केवळ ३०३ मुलींना लस देण्यात आली आहे. यामागे एचपीव्ही लसीकरणाबाबत असलेले गैरसमज आणि शाळांच्या सुरू असलेल्या परीक्षा कारणीभूत आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे म्हणाले की, या लसीकरणाबाबत पालकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर करण्यासाठी शाळांमध्ये पालकांच्या बैठकांचे आयोजन केले जात आहे. त्यात लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासोबतच पालकांच्या शंकांचे निरसन केले जात आहे. याचबरोबर आशा सेविकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन जागृती केली जात आहे. आता १ एप्रिलपासून कुटुंब पाहणी सर्वेक्षण परिचारिकांकडून सुरू झाले आहे. त्यांच्याकडूनही या लसीकरणाबाबत माहिती दिली जात आहे. यामुळे आगामी काळात लसीकरणात वाढ होण्याची अपेक्षा आहे. महापालिकेच्या सर्व दवाखान्यांत ही लस मोफत दिली जात आहे.

एचपीव्ही लसीकरण महत्त्वाचे

जगभरातील लाखो महिला गर्भाशय मुखाच्या कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराशी लढत आहेत. या कर्करोगाच्या ९९.७ टक्के रुग्णांमध्ये एचपीव्ही या विषाणूचा संसर्ग हे मुख्य कारण दिसून येते. या विषाणूचा दीर्घ काळ टिकणारा संसर्ग पुढे कर्करोगास कारणीभूत ठरू शकतो. या पार्श्वभूमीवर २०३० पर्यंत गर्भाशय मुखाचा कर्करोग निर्मूलनाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी २०३० पर्यंत १५ वर्षांखालील मुलींमध्ये एचपीव्ही लसीकरणाचे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत नेणे हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

दुष्परिणाम नाहीत

एचपीव्ही लसीकरणाबाबत अनेक गैरसमज आहेत. या लसीमुळे मुलींचे मासिक पाळीचे वेळापत्रक बिघडते, भविष्यात गर्भधारणा होत नाही, असे अनेक गैरसमज आहेत. आतापर्यंतच्या वैद्यकीय पुराव्यांनुसार या लसीचे कोणतेही दुष्परिणाम समोर आलेले नाहीत. त्यामुळे पालकांनी मुलींना लस देऊन त्यांना गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या धोक्यापासून वाचवावे, असे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी स्पष्ट केले. 

पुण्यातील एचपीव्ही लसीकरण

उद्दिष्ट – ३३ हजार

मोहिमेआधी लसीकरण (८ मार्चपर्यंत) – २,२६५

मोहिमेतील लसीकरण (९ मार्चपासून) – ३०३