सलग सुट्टय़ांमुळे जेजुरीत भाविकांची प्रचंड गर्दी

साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीत गेल्या चार दिवसांपासून भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती

साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीत गेल्या चार दिवसांपासून भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. सलग सुट्टय़ांमुळे राज्यभरातून भाविक मोठय़ा संख्येने जेजुरीत आल्याने नियोजनाची सारी यंत्रणा कोलमडून पडली. कडाक्याची थंडी पडलेली असतानाही पहाटेपासून रात्री दहापर्यंत खंडोबा गडावर हजारो भाविक दर्शन रांगेत उभे राहिल्याचे पाहावयास मिळाले.
बुधवारपासूनच शहरातील सर्व धर्मशाळा, हॉटेल, पुजारी-सेवेकरीवर्गाची निवासस्थाने हाउसफुल्ल झाली होती. अनेकांना राहण्यासाठी जागा मिळू शकली नाही. चिंचेच्या बागेचा परिसर व गावातील रस्त्यावर मिळेल येथे भाविकांनी वाहने उभी केल्याने गावातही ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. पुणे-पंढरपूर व मोरगाव रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याने पोलिस यंत्रणेवर ताण आला. खंडोबा गडावर भाविकांच्या गर्दीमुळे रांगेचे नियोजन कोलमडले. पन्नास रुपयांचा दर्शन पास घेऊनही दोन ते अडीच तास, तर मोफत दर्शन रांगेत तीन ते चार तास उभे राहावे लागल्याने हाल झाल्याची तक्रार भाविकांनी केली.
अनेक पर्यटकांनी पर्यटनाबरोबरच खंडोबा यात्रेचा आनंद घेतला. गर्दीच्या मानाने गडावर भंडार खोबऱ्यांची उधळण कमी दिसली. देवस्थानच्या नियोजित दर्शन मंडपाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे खंडोबा यात्रा त्रासाची व कष्टाची होत असल्याचे चित्र दिसत आहे. गडावर मोठय़ा यात्रेचे स्वरूप आले होते. पूर्व बाजूच्या दरवाजातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. तेथे चेंगराचेंगरी होत असल्याने महिला व मुलांचे हाल झाले. खंडोबा गडावर होणारी भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दर्शनाचे योग्य नियोजन करावे अशी भाविकांनी मागणी केली.
‘जय मल्हार’मुळे बानुबाईच्या दर्शनाला रांग
जय मल्हार मालिकेमुळे जेजुरीला येणाऱ्या भाविकांमध्ये चौपट वाढ झाली आहे. गडावर येणारे भाविक प्रामुख्याने बानुबाईचा राजवाडा व म्हाळसेचा महाल कोठे आहे? याची चौकशी करताना दिसत आहेत. त्याचबरोबर गडावरील म्हाळसेची दगडी शिळा, साक्षी विनायक, हेगडी प्रधान, काíतक स्वामी, नारदमुनींच्या पादुकांचे भाविक आवर्जून दर्शन घेताना दिसत आहेत. मालिकेमुळे दररोजच भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने व्यावसायिकांना मात्र सोन्याचे दिवस येऊ लागले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Huge crowd devotees jejuri