पुणे : दक्षिण कोरियातील ह्युंदाई स्टील कंपनीसह नऊ कंपन्यांनी तळेगाव दाभाडे औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. ह्युंदाई स्टीलच्या प्रकल्पाच्या उभारणीचे काम सुरू असून, तो पुढील वर्षी जूनमध्ये कार्यान्वित होणार आहे.
ह्युंदाई स्टीलसह संगवू हायटेक, एन्व्हीएच् इंडिया, पीएचए इंडिया, कोमोस ऑटोमोटिव्ह, डूवन ऑटोमोटिव्ह, पॅराकोट प्रॉडक्ट, मुव्हमॅक्स सिस्टम व लॉजिस्टिक प्युअर ऑल या कंपन्यांनीही दाभाडे औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. या कंपन्यांना आर. एम. के. स्पेसेसने ७० एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे. या जागेचा मालकी हस्तांतरण कार्यक्रम शुक्रवारी झाला. यावेळी आर. एम. के. स्पेसेसचे कार्यकारी संचालक रणजीत काकडे आणि रामदास काकडे, ह्युंदाई स्टील इंडियाचे मुख्य वित्तीय अधिकारी डाँग सेओब ली यांच्यासह इतर कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
हेही वाचा >>> पिंपरी : वडिलधाऱ्यांनी वयाच्या सत्तरीनंतर मुलांकडे जबाबदारी दिली पाहिजे; अजित पवार यांचा शरद पवार यांच्यावर निशाणा
यावेळी बोलताना आर. एम. के. स्पेसेसचे कार्यकारी संचालक रणजीत काकडे म्हणाले की, या सर्व कंपन्या एकूण २ हजार २६० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, त्यातून २ हजार ६४० जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. मंगरूळ, नवलाखउंबरे, बदलवाडी, करंजविहिरे या परिसरात या कंपन्यांचे प्रकल्प उभे राहाणार आहेत. येत्या ६ महिन्यांच्या काळात त्यांच्या प्रत्यक्ष उत्पादनास प्रारंभ होणार आहे. या गुंतवणुकीमुळे भविष्यात नवनवीन उद्योग तळेगाव दाभाडे औद्योगिक क्षेत्राकडे आकर्षित होतील.
तळेगाव दाभाडेमध्ये कंपनीकडून २६० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. तळेगावमधील जनरल मोटर्सचा प्रकल्प ह्युंदाई मोटर्सने ताब्यात घेतला असून, या प्रकल्पाला मोटारींच्या उत्पादनासाठी पोलादाचा पुरवठा प्रामुख्याने केला जाईल. त्यानंतर इतर कंपन्यांनाही पोलाद पुरवठा केला जाईल. हा प्रकल्प पुढील वर्षी जून महिन्यात कार्यान्वित होईल. – डोंग सेओब ली, मुख्य वित्तीय अधिकारी, ह्युंदाई स्टील इंडिया