’ अवजड वाहनांकडून मार्गिकांच्या नियमांचे उल्लंघन
’ वाहनांच्या अतीवेगावर नियंत्रणाची ठोस यंत्रणा नाही
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर घाट क्षेत्रामधील तीव्र उतार व वळणाची ठिकाणे त्याचप्रमाणे सुरक्षित दुभाजकांच्या अभावामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असले, तरी या मार्गावर होणारे बहुतांश अपघात मानवी चुकांमुळे होत असल्याचे समोर येत आहे. ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या आकडेवारीनुसार ८५ टक्के अपघात चालकाच्या सदोष ड्रायव्हिंगमुळे, तर इतर अपघात मार्गावरील असुविधांमुळे होत आहेत. छोटी, मध्यम आकाराची वाहने व जड वाहनांसाठी वेगवेगळ्या मार्गिका आहेत, मात्र त्याचे नियम पाळले जात नसल्याचा गंभीर मुद्दाही समोर आला आहे.
द्रुतगती मार्गावर रविवारी पहाटे झालेल्या अपघातात १७ जणांना प्राण गमवावे लागले. या भीषण अपघातामुळे द्रुतगती मार्गावरील मृत्यूच्या सापळ्याचा भयावह प्रश्न प्रखरतेने समोर आला आहे. दोन आठवडय़ांपूर्वी घाट क्षेत्रामध्ये प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या मोटारीला अपघात झाला होता. या अपघातांमधून द्रुतगती मार्गावरील त्रुटी व मानवी चुकांचे मुद्दे ऐरणीवर आले आहेत. मागील वर्षभरात या रस्त्यावरील अपघातात नव्वदहून अधिक नागरिकांचे प्राण गेले आहेत. घाट क्षेत्रामध्ये तीव्र उतार व वळणाचा रस्ता आहे. याच टप्प्यामध्ये ‘नो मॅन लॅन्ड’ची मार्गिका नाही. अपघात क्षेत्रात सुरक्षेच्या दृष्टीने मजबूत दुभाजक असलेली ही मार्गिका नसल्याने अपघातग्रस्त वाहने विरुद्ध दिशेच्या मार्गावर येऊन अपघाताची भीषणता वाढते.
तीव्र उताराच्या भागामध्ये डिझेल वाचविण्याच्या प्रयत्नात जड वाहनांचे चालक बहुतांश वेळेला वाहन न्यूट्रलमध्ये चालवितात. अशा वेळी अचानक ब्रेक लावण्याचा प्रसंग आल्यास तो लागत नाही. त्यामुळे वाहनावरील ताबा सुटतो व अपघात होतात. जड वाहनांच्या चालकाकडून मार्गिकेच्या नियमांचेही सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे दिसते. पहिली मार्गिका ही पुढील वाहनाला ओलांडून जाण्यासाठी आहे. दुसरी मार्गिका मोटारी व मध्यम आकाराच्या वाहनांसाठी, तर तिसरी मार्गिका जड वाहनांसाठी आहे. मात्र, प्रामुख्याने रात्री व अनेकदा दिवसाही जड वाहनांच्या चालकांकडून कोणत्याही मार्गिकेवरून वाहन चालविले जाते. मागून येणाऱ्या वाहनांना वळणे घेत जड वाहनांना ओलांडावे लागते. त्यातून अपघाताचा धोका आणखी वाढतो. मार्गिकेचे नियम न पाळणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने ही बेशिस्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
मानवी चुकांमधील आणखी महत्त्वाचा मुद्दा या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या अतीवेगाचा आहे. प्रतितास ८० किलोमीटर वेगाने वाहन चालविण्याचे द्रुतगतीवर बंधन आहे. मात्र, कोणत्याही चालकाकडून त्याचे पालन केले जात नाही. अतीवेगाबाबत कारवाई करण्यासाठी पोलिसांकडे स्पीड गन आहेत. मात्र, ही कारवाई सातत्याने व कठोरपणे होत नसल्याचेही दिसून येते.

प्राण वाचविण्यासाठी सर्वाचा समन्वय हवा
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातात नाहक जाणारे प्राण वाचविण्यासाठी शासन, वाहतूकदार, चालक, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरटीओ, पोलीस आदी सर्वाचाच समन्वय हवा आहे. मानवी चुका टाळण्याबरोबरच पायाभूत सुविधांकडेही लक्ष द्यावे लागणार असून आम्ही त्याबाबत अनेक दिवसांपासून मागणी करीत असल्याचे ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे बाबा शिंदे यांनी सांगितले. वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणांच्या समस्येची उकल त्यातून व्हावी. त्याचप्रमाणे प्रवासी बस व जड वाहने चालविणाऱ्या प्रत्येक वाहन चालकाला त्याच्या परवान्याच्या नूतनीकरणावेळी तीन वर्षांनी सुरक्षिततेबाबतचा रिफ्रेशमेंट कोर्सची सक्ती संघटना करणार आहे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.