Rohit Pawar Disgusting Politics Statement: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहेत. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी आणि दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण यावरुन विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. विलीनीकरणाची चर्चा झाली होती असा दावा शरद पवार गटाचे नेते करत आहेत. तर, अजित पवार गटाचे नेते हा दावा खोडून काढत आहेत. अशात राष्ट्रवादी (शरद पवार) चे आमदार रोहित पवार यांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. ‘राजकारणापुढे माणसाच्या जिवाची किंमत शून्य झाली आहे’, अशा शब्दात रोहित पवार यांनी सध्याच्या राजकारणावर नाराजी व्यक्त केली आहे.
तेरा दिवस राजकारणावर भाष्य नाही
अजित पवार यांच्या निधनामुळे जोरदार धक्का बसल्यानंतर रोहित पवार यांनी हा काळ शोक आणि आत्मचिंतनाचा असल्याचे मत मांडले होते. तेरा दिवस राजकारणावर कोणतेही भाष्य करणार नाही असं रोहित म्हणाले होते. ०९ तारखेनंतर (फेब्रुवारी) राजकीय चर्चा करेन असे रोहित पवार म्हणाले होते. यानंतर रोहित पवारांनी राजकारणावर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. या पोस्टमध्ये रोहित यांना सध्याच्या राजकारणावर स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
रोहित पवारांची पोस्ट काय आहे?
राजकारण किळसवाणं आणि घृणास्पद झालंय असं सांगताना राजकारणापुढं माणसाच्या जिवाची किंमत अक्षरश: शून्य झालीय, असे रोहित पवारांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे. “छक्के – पंजे करता येणं हाच राजकारणचा बेसिक निकष असेल तर चांगल्या व्यक्तीने खरचं राजकारणात रहावं का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही”, अशा शब्दात रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अजितदादा जाण्याच्या दु:खाची व्याती मोठी
राजकीय चर्चेपेक्षा अजितदादा जाण्याच्या दु:खाची व्याती कितीतरी पट मोठी आहे, अशी भूमिका रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी मांडली होती. दादा आपल्यात नाहीत, अशा वातावरणात कुणीही राजकीय चर्चा करणं योग्य नाही. दादांच्या आत्म्याला क्लेश होईल, त्यांच्या विचारांना ठेच पोहोचेल असे कुणीही बोलू नये, अशी विनंती देखील रोहित पावर यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.
विलीनीकरणाचं राजकारण
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणबाबत अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा झाली होती. फडणवीसांनी यात बोलण्याचा संबंध नाही, असे शरद पवार आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषद म्हणाले. तर, राष्ट्रवादी विलीनीकरणाचा विषय संपला असून, त्यावेळी झालेली स्थानिक युती होती, अशा शब्दात राष्ट्रवादी (अजित पवार) चे नेते प्रफुल पटेल यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

