scorecardresearch

‘असनी’ चक्रीवादळ आज आंध्र प्रदेश, ओडिशाच्या किनारपट्टीवर; राज्यात तीन दिवस हलक्या पावसाचा अंदाज

अंदमानच्या समुद्रात शनिवारी (७ मे) तयार झालेल्या ‘असनी’ चक्रीवादळाने सोमवारी (९ मे) वेग घेतला आहे. या चक्रीवादळाचे रूपांतर तीव्र चक्रीवादळामध्ये झाले आहे.

पुणे : अंदमानच्या समुद्रात शनिवारी (७ मे) तयार झालेल्या ‘असनी’ चक्रीवादळाने सोमवारी (९ मे) वेग घेतला आहे. या चक्रीवादळाचे रूपांतर तीव्र चक्रीवादळामध्ये झाले आहे. हे चक्रीवादळ मंगळवारी (१० मे) आंध्रप्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकणार आहे.
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार हे चक्रीवादळ सध्या अंदमान निकोबार बेटांपासून २७० किलोमीटर, पोर्टब्लेअरपासून ४५० कि.मी., तर आंध्रप्रदेश व पुरीपासून ६१० कि.मी. अंतरावर खोल समुद्रात आहे. मंगळवारी हे चक्रीवादळ उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिसाच्या किनारपट्टीवर पोहोचणार आहे. सध्या या चक्रीवादळाचा वेग ताशी ८० ते ९० कि.मी. असून, मंगळवारी हा वेग ताशी १०० ते १२० कि.मी. एवढा होण्याची शक्यता आहे. बुधवारनंतर (११ मे) या चक्रीवादळाचा वेग कमी होऊन तो ६० ते ७० प्रति तास एवढा होईल. गुरुवारी (१२ मे) या चक्रीवादळाचे रूपांतर कमी दाबाच्या पट्टय़ात होणार आहे. या चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला असून, मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
आगामी तीन दिवस देशभर उष्णतेची लाट असणार आहे. देशातील राजस्थान, दिल्ली, हरियाणा, गुजरात, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र (विदर्भ), उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांत पुढील तीन दिवस अतितीव्र उष्णतेची लाट कायम राहणार आहे. राज्यातील अकोला, अमरावती, वाशिम आणि यवतमाळ या भागात उष्णतेच्या लाटेचा पिवळा इशारा देण्यात आला आहे. १० मे रोजी आंध्रप्रदेश, ओडिसा, तर ११ मे रोजी आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल आणि ओडिसा या भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा; प्रत्यक्षात ढगाळ वातावरण
नागपूर : हवामान खात्याने विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असताना प्रत्यक्षात ढगाळ वातावरण आहे. ८ मेपासून नागपूरसह विदर्भातील काही शहरांत पुन्हा तापमानाचा उच्चांक नोंदवला जाईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला होता. मात्र, नागपुरात उन्हाचे चटके आणि ढगांचे आच्छादन अशी दुहेरी स्थिती आहे. हवामान खात्याने आता पुन्हा ९ ते १२ मेदरम्यान विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटांचा इशारा दिला आहे.
राज्यात पाऊस कुठे?
’१० ते १३ मे रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग
’१३ मे रोजी पुणे, धुळे, जळगाव, नाशिक आणि नगर
’११ ते १३ मे रोजी मुंबई, परभणी, कोल्हापूर आणि सातारा
’१३ मे रोजी सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना आणि बीड

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hurricane asani coast andhra pradesh odisha today three days light rain forecast state amy

ताज्या बातम्या