पुणे : फिट इंडिया मोहिमेच्या जनजागृतीसाठी उद्योजक कांथी दत्त आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या वतीने हैदराबाद ते मुंबई या ७५० किलोमीटर सायकल मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ७ मार्चपासून सुरू होणाऱ्या या मोहिमेद्वारे तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांमधील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये संवाद सत्रे, भेटीगाठी आणि सदृढ आरोग्यावर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे उपमहासंचालक मयांक श्रीवास्तव यांनी दिली.

या दरम्यान, १२ मार्चला पुण्यातील फिनिक्स मार्केट सिटी येथे कांथी दत्त यांच्या विशेष संवाद सत्राचे आयोजन करण्यात येणार असल्याचे फिनिक्स मॉल्स पुणेचे सीनियर सेंटर डायरेक्टर अंशुमन भारद्वाज यांनी सांगितले. सत्राच्या सुरुवातीला मल्टिफिट इंडियाच्या टीमकडून कम्युनिटी झुंबा आणि फिटनेस सत्र घेण्यात येणार आहे. त्यानंतर अभिनेता अयान लल्ल, आहारतज्ञ अमिता गद्रे मार्गदर्शन करणार असून, नयनदीप रक्षित सूत्रसंचालन करणार आहेत. एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स आणि साई सिल्क कलामंदिर यांच्या सहकार्याने हे सत्र आयोजित करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

उपक्रमाच्या व्यापक उद्दिष्टांबाबत बोलताना मयांक श्रीवास्तव म्हणाले, ‘या ७५० किलोमीटर सायकलिंग मोहिमेद्वारे आम्ही तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये प्रत्यक्ष स्तरावर लोकांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. ही मोहीम केवळ सायकलिंगपुरती मर्यादित नसून, मोहिमेच्या मार्गावरील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये संवाद सत्रे, भेटीगाठी आणि फिटनेसविषयक चर्चा आयोजित करून तरुणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हा उपक्रम फिट इंडिया चळवळीच्या भावनेला बळ देत नागरिकांना, विशेषतः तरुणांना, सायकलिंग आणि सक्रिय जीवनशैली दैनंदिन आयुष्याचा भाग बनवण्यास प्रेरित करेल.’

‘फिट इंडिया’ मोहीम सविस्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २९ ऑगस्ट २०१९ (राष्ट्रीय क्रीडा दिन) रोजी नवी दिल्लीत ‘फिट इंडिया’ मोहिमेची घोषणा केली. ‘फिटनेस का डोस, आधा घंटा रोज’ हे मोहिमेचे घोषवाक्य आहे. भारतीयांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करून जीवनशैलीशी संबंधित आजारांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने ‘फिट इंडिया’ मोहीम राबवण्यात येत आहे.

जनजागृतीसाठीचे प्रयत्न

भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) अधिकारी नरेंद्र कुमार यादव यांची फिट इंडियाचे प्रसिद्धीदूत म्हणून निवड करण्यात आली. या पदावर नियुक्त होणारे ते पहिले सनदी अधिकारी आहेत. त्यानंतर २०२६ मध्ये अभिनेता आयुष्मान खुराना याची ‘फिट इंडिया आयकॉन’ म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच विराट कोहली, मिलिंद सोमन, शिल्पा शेट्टी यांसारखे अनेक सेलिब्रिटी या मोहिमेचा प्रचार करतात.

आर्थिक तरतूद

हा उपक्रम युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून राबवण्यात येतो. क्रीडा क्षेत्रासाठी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात ४ हजार ४७९.८८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. फिट इंडिया आणि खेलो इंडियाच्या सक्षमीकरणासाठी या निधीचा वापर केला जाणार असल्याचे क्रीडा मंत्रालयाकडून कळविण्यात आले. तसेच ‘फिट इंडिया’ हे ‘जन-आंदोलन’ असल्याने विविध सरकारी योजना आणि खासगी क्षेत्राच्या सहभागातून निधीची उभारणी केली जाते.

उपक्रम आणि ध्येय

या मोहिमेच्या माध्यमातून शाळांना त्यांच्या क्रीडा पायाभूत सुविधांनुसार ३-स्टार आणि ५-स्टार मानांकन दिले जाते. फिट इंडिया क्विझ, संडेज ऑन सायकल इत्यादी उपक्रम राबवले जातात. तसेच फिट इंडिया मोबाईल ॲपद्वारे नागरिक स्वतःचा फिटनेस स्कोअर आणि आहाराचे नियोजन ट्रॅक करू शकतात. भारताला २०३६ ऑलिम्पिकचे यजमानपद मिळावे आणि देशातील प्रत्येक नागरिकाला तंदुरुस्त बनवणे ध्येय या मोहिमेत निश्चित करण्यात आले आहे.