पुणे : चिप्सच्या डब्यातून हायड्रोपोनिक गांजा तस्करीचा प्रकार सीमाशुल्क विभागाने (कस्टम) उघडकीस आणला. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून आलेल्या महिलेकडून ७२ लाख २० हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली.

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ६ डिसेंबर रोजी परदेशातून आलेली महिला विमानातून उतरली. महिलेने हायड्रोपोनिक गांजा चिप्सच्या डब्यात लपवून आणला होता. विमानतळाच्या आवारातून घाईघाईत बाहेर पडण्याच्या प्रयत्नात महिला होती. कस्टमच्या (एअर इंटलिजन्स युनिट) पथकाने तिच्या हालचाली टिपल्या. कस्टमच्या पथकाने महिलेकडील सामानाची तपासणी केली. तेव्हा चिप्सच्या दोन डब्यात गांजा लपविल्याचे उघडकीस आले. महिलेकडून ७२२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या हायड्रोपोनिक गांजाची किंमत आंतराष्ट्रीय बाजारपेठेत ७२ लाख २० हजार रुपये असल्याची माहिती कस्टमच्या अधिकाऱ्यांनी दिली.

महिलेला ताब्यात घेऊन तिच्याविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेने हायड्रोपोनिक गांजा कोणाकडून आणला, तसेच ती कोणाला देणार होती, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर हायड्रोपोनिक गांजाची तस्करी करणाऱ्या एका प्रवाशाला कस्टमने नुकतेच पकडले. प्रवाशाकडून दोन कोटी २९ लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. बँकाॅकहून पुणे विमानतळावर उतरलेल्या प्रवाशाने त्याच्याकडील सामानात गांजा लपविला होता. हायड्रोपोनिक गांजाची लागवड नियंत्रित वातावरणात केली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात नियंत्रित वातावरणात लागवड करण्यात आलेल्या गांजाची किंमत मोठी असते.

शहरात गांजाविक्रीचे प्रमाण वाढले असून, पोलिसांनी मुंढवा आणि वाघोली परिसरात कारवाई केली. त्यामध्ये महिलेसह चौघांना अटक करण्यात आली. वाघोली परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत सौरभ अशोक साबळे (वय २३), समर्थ दत्तात्रय बनसोडे (वय २३), अमिन रहिमतुल्ला डांगे (वय २३, रा. इंदापूर तालुका) यांना अटक करण्यात आली. नगर रस्ता भागात वाघोली पोलीस गस्त घालत होते. वाघेश्वरनगर परिसरात एक टेम्पाे थांबला होता. टेम्पोतून गांजा वाहतूक करण्यात येत असल्याची पोलिसांनी मिळाली. वाघेश्वरनगर परिसरात एक टेम्पाे थांबला होता. टेम्पोतून गांजा वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी पांडुरंग माने आणि साई रोकडे यांना मिळाली.

पोलिसांच्या पथकाने सापळा लावून साबळे, टेम्पोतून दीड किलो गांजा जप्त करण्यात आला. तिघांची चौकशी करण्यात आली. तेव्हा तिघे जण पुण्यात गांजा विक्रीसाठी घेऊन निघाल्याची माहिती चौकशीत मिळाली. मुंढवा भागात गांजाविक्री करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली. निकिता राकेश गारूंगे (वय २९, रा. केशवनगर, मुंढवा) असे तिचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पथक मुंढवा परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी आरोपी निकिता ही घराच्या परिसरात गांजाविक्री करत असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांच्या पथकाने केशवनगर येथील गायरान वस्तीतील घरावर छापा टाकला. आरोपी महिलेच्या घरातून गांजा, मोबाइल संच जप्त करण्यात आला. बिबवेवाडी भागात एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून पसार झालेल्या सराइताला अटक करण्यात आली. सराइताकडून दीड किलो गांजा, तसेच दुचाकी जप्त करण्यात आली. श्रेयस दिगंबर सोनवणे (वय १९, रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.