शंभर दिवसांत महागाई कमी करण्याचे आश्वासन देणारे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार शंभर महिन्यांनंतरही जनतेप्रति उत्तरदायी नसल्याची टीका करीत भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार सत्तेवर आल्यास दर वर्षांला सरकारच्या कामकाजाचा लेखाजोखा जनतेला सादर करू, असे आश्वासन शुक्रवारी दिले.
विविध कार्यक्रमांसाठी पुण्यामध्ये आगमन झाल्यानंतर मोदी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. लोहगाव विमानतळाच्या परिसरामध्ये झालेल्या सभेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मोदी बोलत होते. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस आणि शहराध्यक्ष अनिल शिरोळे यांच्या हस्ते घोंगडी, फेटा आणि नांगर प्रदान करून मोदी यांचा सत्कार करण्यात आला. खासदार प्रकाश जावडेकर, आमदार गिरीश बापट, माधुरी मिसाळ, बाळा भेगडे, भीमराव तापकीर, चंद्रकांत पाटील, भाजयुमो प्रदेशाध्यक्षा आमदार पंकजा मुंडे-पालवे आणि नगरसेवक योगेश मुळीक या वेळी उपस्थित होते.
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये देशाची सेवा करण्याची संधी कोणत्या पक्षाला द्यायची याचा निर्णय जनतेला घ्यायचा आहे. या देशामध्ये काँग्रेस पक्षाला दीर्घकाळ सरकारची संधी मिळाली. तर, राज्य पातळीवर कम्युनिस्टांसह प्रादेशिक पक्ष, प्रादेशिक पक्षांच्या आघाडीला आणि काही राज्यांमध्ये  भाजपलाही संधी मिळाली. त्यामुळे देशातील जनतेसमोर सर्व मॉडेल्स आहेत. काही परिमाणांच्या आधारे कोणत्या राज्यामध्ये किती विकास झाला आणि जनतेच्या आकांक्षांची पूर्ती झाली की नाही याचा तुलनात्मक अभ्यास राजकीय पंडित आणि अर्थशास्त्राच्या तज्ज्ञांनी करावा. भाजपला संधी मिळाली तेव्हा जलदगतीने विकास करण्यामध्ये योगदान दिले आणि लोकांच्या अपेक्षांची पूर्ती करण्याचा प्रयत्न झाला. मोरारजीभाई देसाई यांच्या मंत्रिमंडळात जनसंघाच्या माध्यमातून आणि अटलबिहारी वाजपेयी सरकार सत्तेवर असताना महागाई नियंत्रित होती. गरिबांना दोनवेळा पोटभर अन्न मिळायचे.
१०० दिवसांत महागाई कमी करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले होते. मात्र, १०० महिने होऊनही महागाई कमी झाली नाही. जनतेला जाब विचारण्याचा अधिकार आहे, असे सांगून मोदी म्हणाले, काँग्रेस पक्षाला अहंकाराने ग्रासले आहे. त्यांचा एकही नेता प्रसार माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देत नाही. जनतेप्रति उत्तरदायित्व आहे असे या सरकारच्या कृतीतून दिसत नाही. एकीकडे पंतप्रधान आणि सरकार काही करीत नाही आणि प्रश्न मात्र मोदीलाच विचारले जातात. गुजरातमध्ये दहा महिन्यांपूर्वीच मी परीक्षा दिली आहे. काँग्रसने मला टीकेचे लक्ष्य केले. भरपूर पैसा ओतला. कोर्टकचेऱ्या झाल्या. ‘सीबीआय’चा ससेमिरा मागे लावला. मात्र, विकासासंदर्भात परीक्षक असलेल्या जनतेने तिसऱ्यांदा दोन-तृतीयांश बहुमताने विजयी केले. काँग्रेस अध्यक्षा आणि दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी महिला असतानाही देशातील महिला सुरक्षित नाहीत. ३५ वर्षांखालील ६५ टक्के युवाशक्तीला बरोबर घेऊन भारताला नवी शक्ती प्रदान करण्याची संधी द्यावी.
जरुरत पडे तो जीवनभी आपके लिये
माझी दादी (इंदिरा गांधी) आणि पिताजी (राजीव गांधी) यांनी देशासाठी बलिदान दिले असून माझीदेखील हत्या होईल की काय असे वाटते ही शंका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी एका जाहीर सभेत व्यक्त केली होती. त्याविषयीचा उल्लेख टाळून मोदी यांनी मी तुमच्याचसाठी जगणार असून जरुरत पडेल तेव्हा जीवनदेखील समर्पित करेन, असे भावपूर्ण उद्गार काढले. ‘जियेंगे तो आपके लिये, जरुरत पडे तो जीवनभी आपके लिये’, असे मोदी म्हणाले.

जाहीर भाषणानंतर मोदी यांची
मंगेशकर रुग्णालयात तपासणी
गरवारे महाविद्यालच्या मैदानावर झालेल्या जाहीर कार्यक्रमानंतर नरेंद्र मोदी यांना घशाचा त्रास जाणवू लागल्यामुळे कार्यक्रमानंतर तपासणीसाठी ते पुन्हा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेले. तेथील तपासणी पूर्ण झाल्यानंतर लोहगाव येथून मोदी पाटण्याला रवाना झाले. या तपासणीत मोदी यांच्या तब्येतीत कोणताही दोष आढळला नाही.